HOME   टॉप स्टोरी

लातूर महानगरपालिकेत झाले जादूचे खेळ कामाच्या वेळेत!

कागदापासून नोटा, माणसाचे दोन तुकडे, कागदापासून बनतो लाडू!


लातूर: लातूर महानगरपालिका आणि जादू यांचं काहीतरी नातं असावं. अनेकजण मनपातील कर्मचार्‍यांना जादूगारही म्हणतात. कधी रजिस्टरवर दिवे असतात, पण खांबावर नसतात, स्टॉक रजिस्टरवर तुरटी असते पण प्रत्यक्षात जलशुध्दीकरण केंद्रावर नसते. अनेकांना पाण्याची बिलेच मिळत नाहीत तर अनेकांना डबल येतात, कधी अधिक येतात. एक गाळा भाड्याने दिलेला असतो पण चार चार ताब्यात असतात. गाळा मागायला आलेल्यांना संपले म्हणून सांगतात पण प्रत्यक्षात अनेक रिकामे असतात, त्यात कुणीतरी भाडेकरु धंदा करीत असतो, कुठल्यातरी साहेबांना भाडेही देत असतो. या सगळ्या जादूगारातले महामहिम शिरोमणी जादूगार होते कुटकर! अशा अनेक जादुगारांनी भरलेल्या महापालिकेत आज सकाळी अकरा ते बारा या अत्यंत कामाच्या वेळेत जादूचे खेळ झाले. अमरावतीहून आलेल्या सय्यद फेरोज या व्यक्तीने हे खेळ करुन दाखवले. ४० ते ५० कर्मचार्‍यांनी खेळ पाहिले अशी माहिती पांडुरंग अयाचित या कर्मचार्‍या दिली. याचवेळी जादूगार सय्यदही भेटले. मनपात मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खूश होते. पेट के लिए करता हूं. ये तो कला है वगैरे ते सांगत होते.
ताजा कलम: जादुगाराने कागदापासून चलनी नोटा करुन दाखवल्याने मनपाचे बहुतांश कर्मचारी कचरा डेपोकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. या डेपोवर २० वर्षांपासून कचर्‍यातला कागद मुबलकपणे पडून आहे. त्याच्या नोटा झाल्या तर महापालिकेची गरिबी हटून जाईल असं त्यांना वाटतं. दरम्यान कुणीतरी मनपाची तिजोरी चोरीला गेल्याचं जादुगाराला सांगितलं. जादूगार एक मिनिटात हजर करतो म्हणाला, पण पोलिसांची नसती भानगड मागे लागू नये म्हणून कर्मचार्‍यांनी तिथून काढता पाय घेतला!


Comments

Top