HOME   टॉप स्टोरी

मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही- सुषमा अंधारे

अ‍ॅट्रॉसिटी मूलभूत हक्कात, असा कायदा रद्द होऊच शकत नाही, अंधारे यांचा दावा


लातूर: मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळू शकत नाही, हे त्यांनाही माहित आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अकारण केली गेली. घटनेनुसार तेही शक्य नाही. आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चातून घटनाबाह्य मागण्या करण्यात आल्या असा आरोप विचारवंत, आघाडीच्या वक्त्या, प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांनी केला. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पॅंथर क्रांती संघटनेच्या वतीने आंबेडकर चौकात त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचं अध्यक्षपद रिपाइं नेते चंद्रकांत चिकटे यांनी भूषवलं होतं. संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र उर्फ चंदा कांबळे, संस्थापक कार्याध्यक्ष गौतम सूर्यवंशी, संस्थापक सचिव दत्ता कांबळे, कमलाकर सोनवणे, प्रकाश कांबळे, तातेराव आगवाने, प्रसेनजीत सरवदे, राजकुमार मरे, अ‍ॅड. दशरथ आल्टे, प्रशांत सूर्यवंशी, अण्णाराव विद्यागर, साहेब अली सौदागर यांच्यासह हजारो आंबेडकर अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण या मोर्चाच्या निमित्ताने या राज्यात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या या राज्यात मराठा वगळता कुठलाच समूह नाही, फक्त मराठाच अडचणीत आहे असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मराठा मोर्चे शिस्तीत अन शांततेत निघाले पण या मोर्चाने काहीच साध्य झाले नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, कोपर्डी प्रकरणी न्याय मिळाला पाहिजे, अ‍ॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजे, आर्थिक आणि गुणवत्तेचे निकष लावले पाहिजेत अशा मागण्या केल्या गेल्या. इतरात गुणवत्ताच नाही असे सांगण्याचा, न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तशी रचनाच करण्यात आली होती असा दावा अंधारे यांनी केला.
गुणवत्ता आमच्यातही ठासून भरली आहे. सगळ्याच क्षेत्रात आम्ही आमची गुणवत्ता दाखवून दिली आहे असे सांगत त्यांनी अनेक उदाहरणे दिली. अ‍ॅट्रॉसिटीचा आणि मराठा मोर्चांचा कसलाही संबंध नव्हता. अ‍ॅट्रॉसिटी हा विषय राज्य घटनेच्या मुलभूत हक्कात असताना मुलभूत हक्काच्या विषयावर कायदा रद्द्बातल होत नाही हे त्यांना माहित असताना उगाच हा मुद्दा घुसडण्यात आला. ४९ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. ४९ टक्के केव्हाच संपले आहेत. कायद्याने आता आरक्षण मिळू शकत नाही. संविधानिक चौकटीत हे आरक्षण बसू शकत नाही. आरक्षण मोर्चावेळी हार्दीक पटेलला बोलावले. हार्दीक पटेल काय म्हणतो? हमको नही तो किसी को भी नही! याचा अर्थ तुम्ही नीटपणे घ्यायला हवा असंही अंधारे म्हणाल्या.


Comments

Top