HOME   टॉप स्टोरी

प्रत्येक शेतकर्‍याला मदत, वेगाने केले पंचनामे- मुख्यमंत्री

गारपीटग्रस्तांना जाहिर केलेली मदत तुटपुंजी, वाढ करुन वाटप करा- आ. अमित देशमुख


लातूर: राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अतिशय वेगाने दोन दिवसात पूर्ण केले. एनडीआरएफप्रमाणे मदत घोषित केली. आता फायनल पंचनामे यायचे आहेत. पंचनाम्यातून कुणी सुटले असतील तर त्यांचीही नोंद घेतली जाईल, प्रत्येक शेतकर्‍याला मदत केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेलीकॉप्टर व्यवस्थित उडाले
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी विमानाने लातूर विमानतळावर आले. पत्रकारांशी बातचीत करुन दोघेही हेलीकॉप्टरने बीडकडे रवाना झाले. हेलीकॉप्टर व्यवस्थित उडाले. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. विनायकराव पाटील, महापौर सुरेश पवार, शैलेश लाहोटी, शैलेश स्वामी, गुरुनाथ मगे, रागिणी यादव उपस्थित होते.
गारपीटग्रस्तांना तुटपुंजी मदत - आ. अमित देशमुख
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला जाईल अशी घोषणा करणाऱ्या सरकारने प्रत्यक्ष मदत करण्याच्यावेळी मात्र हात आखडता घेतला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अपदग्रस्ताना जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून मोठया अपेक्षेने शासनाच्या घोषणेकडे आस लावून बसलेल्या शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिवआ. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीट यामुळे मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्या चार वर्षातील आवर्षण, अतिवृष्टी आणि आताची गारपीट यामुळे या भागातील शेतकरी मोडून पडला आहे. या शेतकरी वर्गाला आधार देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शासनाने अपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसात या संदर्भात शासनाकडून आश्वासने दिली जात होती परंतू प्रत्यक्ष काल मदत जाहीर झाली तेंव्हा सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे. कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये म्हणजे एकरी फक्त २ हजार ७०० रुपये तर सिंचनाखालील जमिनीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये एवढी तोकडी मदत जाहिर केली. शासनाने जाहीर केलेली मदत पेरणी खर्चाऐवढीही नाही, त्यामुळे यातून शेतकऱ्याला दिलासा मिळणे कठीण आहे असेही आ. देशमुख म्हणाले.


Comments

Top