HOME   टॉप स्टोरी

लातूर मनपाने सादर केले ‘शिलकी’ अंदाजपत्रक

४३८.२० कोटींमधून १२.५ कोटी राहणार शिल्लक, खुल्या बैठकीनंतर झाली गुप्त बैठक


लातूर: लातूर महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त अच्युत हंगे यांनी स्थायी अस्मितीच्या बैठकीत ४३८.२० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात १२.५ कोटींची शिल्लक दाखवण्यात आली आहे. काही दिवसांनंतर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.
लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आयुक्त अच्युत हांगे यांनी सन २०१७ - १८ चे सुधारित अंदाजपत्रक तसेच सन २०१८ -१९ चे १२ कोटी ५ लाख रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर केले. या अंदाज पत्रकात अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी १३९ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रमाई आवास (घरकुल) योजनेअंतर्गत सन २०१२-१३ ते सन २०१७- ८ पर्यंत १ हजार ४६४ घरकुलास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४४२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या योजनेवर १४२०.९० लाख रुपयांचा खर्च झालेला आहे. लातूर शहर महानगरपालिका स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र वातानुकूलित करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ३७ लाख रुपयांची तरतूद मंजूर असून हे काम प्रगतीपथावर असल्याचे अंदाज पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
प्रभाग तेथे उद्यान, क्रीडांगणांचा विकास!
लातूर शहर महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नांतून महसुली खर्चासाठी महिला व बाल कल्याण योजना २०४. लाख रु., मागासवर्गीय कल्याण निधीसाठी २०४ लाख रु., अपंग कल्याण निधी १२२. लाख रु., क्रीडांगण विकास ५० लाख रु. कर्ज परतफेडीकरिता तरतूद ३०० लाख रु. अधिकारी- कर्मचारी वेतन व भत्त्यांसाठी ५४४९. लाख रु. सुधारित आकृतिबंध नवीन वाढीव पदाकरिता २०० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा रुग्णालये व दवाखान्याकरिता औषधे, साहित्य खरेदीसाठी २३६. ४५ लाख रु., रोग निर्मूलन हंगामी उपाययोजनेकरिता ८८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा कोंडवाडा दुरुस्तीसाठी १५ लाख, शिक्षण विभागाकरिता १५१ लाख, सार्वजनिक उद्याने व वृक्ष लागवड देखभाल दुरुस्ती करीत ६५ लाख, ग्रंथालय विभागाकरिता ४०.७५ लाख, भूसंपादन व आरक्षणाकरिता ४२० लाख तर कर्मचारी व नगरसेवक प्रशिक्षणासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण महसुली भांडवली खर्चासाठी १३५१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन रस्त्यांकरिता २०० लाख, नवीन गटारांकरिता २०० लाख, नवीन पाईप लाईन करिता ५० लाख, तातडीच्या पाणीपुरवठा योजनेकरिता ५० लाख, प्रभाग तेथे उद्यान व बाल उद्यान विकसित करणे, तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे एकूण महसुली भांडवली खर्चाच्या २५ टक्के प्रमाणे घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन करिता तरुतूद करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाज पत्रकावर स्थायी समितीच्या सदस्यांनी १६ ते २६ फेब्रुवारी पर्यंत आपल्या लेखी सूचना द्याव्यात असे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी सांगितले. या सभेत लातूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या मातोश्री गीतादेवी राठी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांचे पिताश्री भाऊसाहेब देशमुख यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सुशीलादेवी देशमुख मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपा सभागृह नेता शैलेश गोजमगुंडे यांनी मांडला. तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
दोन तास गुप्त बैठक
या बैठकीत आयुक्तांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. सुमारे पाऊण तासात बैठक संपली. त्यानंतर फक्त शुद्ध स्थायी समिती आतल्या खोलीत गेली. तेथे दोन तास ‘फक्त’ शहराच्या ‘कल्याणा’वर विचार विनिमय झाला.


Comments

Top