HOME   टॉप स्टोरी

स्वच्छता सर्वेक्षणाची घाई, असे काळ्याचे पांढरे होई!

तीन दिवसांवर लातुरचे सर्वेक्षण, अनेक गोष्टी करायच्या बाकी, उणे मार्कात मिळेल आघाडी


अहमदपूर, औसा, उदगीर आणि निलंगानंतर आता लातुरची वेळ आली आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छ भारत अभियानात लातुरचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यानुसार सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. शहर सुशोभिकरणाच्या अभियानात सगळे चौक सुशोभित केले जात आहेत. रस्ता दुभाजकांची सजावट करुन ते आता रंगवलेही जात आहेत. शहरातील रस्ता दुभाजक मात्र सगळीकडे सारखे नाहीत. प्रत्येक रस्त्याचे दुभाजक वेगवेगळे आहेत. शाहू चौक ते विवेकानंद चौक या मार्गातील दुभाजकांचे लोखंडी पाईप केव्हाच गायब झाले आहेत. या दुभाजकांचा वापर कचराकुंडी म्हणून केला जात आहे. काही ठिकाणी गाढवांसह मोकाट जनावरे विश्राम करताना दिसतात. शिवाजी चौक ते राजीव गांधी चौक या मार्गावरील दुभाजक रंगवल्यानंतर आता गांधी चौक ते उड्डाण पूल या मार्गावरील दुभाजक रंगवण्याचे काम वेगाने चालू आहे. लातुरचा कोंडवाडा, रस्त्यावर फिरणारी जनावरे, नादुरुस्त रस्ते दुभाजक, जागोजागी होणारी पाण्याची गळती, प्रकाशहीन पथदिवे, अतिक्रमित फूटपाथ, पुन्हा गोलाईत झालेले अतिक्रमण, सतत बंद पडणारी सिग्नल यंत्रणा, जागोजागी कचरा जाळलेल्या खुणा या सगळ्यांना गुण मिळाले तरच लातुरच्या मनपाला स्वच्छ भारत अभियानात नक्की बक्षीस मिळेल!


Comments

Top