HOME   टॉप स्टोरी

कामापुरता मामा! आता कंत्राटी कर्मचारीही रस्त्यावर!

३३ महिने राबवून घ्यायचे आणि पुन्हा कामावर घ्या म्हणून अर्ज करायचा!


लातूर: सरकारच्या विविध विभागात कंत्राटावर कर्मचारी नेमले जातात. त्यांना कामावर घेताना ११ महिन्यांचा करार केला जातो आणि एक दिवसासाठी कामावरुन बाजुला काढून पुन्हा ११ महिन्यांचा करार केला जातो. काम करणाराही चला सरकारात काम करायला मिळतंय, मागेपुढे कायमही होऊन जाऊ या आशेनं काम करतात. ऐन उमेदीचा काळ तिथे झटतात. या ११ महिन्याच्या फेर्‍यात नोकरीचं वयही निघून जातं. कायम काही केलं जात नाही. त्यावर कहर म्हणजे पुन्हा निवड प्रक्रियेला सामोरे जा असं सांगतात. निवड झाली तर ठीक नाही तर घरी बसावं लागतं. वयही जातं अन नोकरीही जाते असा प्रकार सध्या सुरु आहे. याचा निषेध करीत जाचक शासनादेश मागे घ्यावा या मागणीसाठी लातुरच्या २७ विभागात काम करणार्‍या सुमारे २५०० कंत्राटी कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.
तीन वेळा कंत्राटावर काम केलेल्यांना पुन्हा निवड पद्धतीला सामोरे जावे लागेल असा आदेश ०९ फेब्रुवारी २०१८ रोजी काढला आहे. हा आदेश पाहून धाबे दणाणलेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांनी आज आंदोलन केले. सध्या सनदशीर मार्गाने जात आहोत. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा कंत्राटी अधिकारी-कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष विवेक सौताडेकर यांने दिला आहे. सेवेत कायम करुन घेईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन लागू करावे, ०९ फेब्रुवारीचा आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, लातूर जिल्हा आरोग्य संघटना आदींनी पाठिंबा दिला.


Comments

Top