HOME   टॉप स्टोरी

प्लास्टीकच्या वापरातून २०० मीटरचा रस्ता! हे खरं सोनं..

प्रभाग पाचमध्ये विक्रांत गोजमगुंडे यांनी करुन दाखवलं, मार्गदर्शक प्रयोग


लातूर: कचर्‍याला कचरा नका सोनं समजा असं म्हटलं जातं. कचर्‍याचं वर्गीकरण केल्यास अनंत वस्तू मिळतात. त्याचा अकल्पनीय वापर होऊ शकतो आणि पर्यावरणाचं नुकसान टाळता येतं. असाच अभिनव प्रयोग लातूरच्या प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केला आहे. त्यांच्या प्रभागात डांबरी रस्त्याचं काम सुरु आहे. कचरा व्यवस्थापनात कायम डोकेदुखी बनलेल्या प्लास्टीकचं काय करायचं हा प्रश्न त्यांनाही सतावत होता. या अनुषंगानं त्यांनी अभ्यास सुरु केला. इंटरनेट माध्यमातून काही मिळतं का याचा शोध घेतला. तज्ञांचे सल्ले घेतले. आजवरच्या प्रयोगाचे निष्कर्ष माहित करुन घेतले. त्याचाही अभ्यास केला. या सगळ्या स्थितीची माहिती घेऊन काही निष्कर्ष काढले. त्यातून एक मार्ग सापडला. डांबरी रस्ता करताना डांबरासोबत ४० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीच्या तुकड्यांचा-भुग्याचा वापर करता येतो हे लक्षात आले. खडी गरम करुन घेतल्यानंतर त्यावर प्लास्टीकचा भुगा टाकायचा खडीवर एक थर तयार होतो. नंतर डांबराचे पाणी या थरात एकजीव होऊन उत्तम मिश्रण तयार होते. हेच मिश्रण अंथरुन रस्ता तयार करायचा अशी पद्धती विक्रांत यांनी अवलंबली आणि मार्ग निघाला! प्लास्टीकच्या वापरातून मार्ग तयार करण्याचा रस्ता सापडला. या प्रयोगातून २०० मीटर लांबी आणि ०९ मीटर रुंदीचा रस्ता तयार झाला!
यापुढे डांबरी रस्ते तयार करताना किमान १० टक्के प्लास्टीक वापरावं असा दंडक घालावा असं विकांत यांना वाटतं. पण हा रस्ता आपल्याकडच्या वातावरणाला, रहदारीला, पावसाला, चिखलाला, वाहनांच्या टायरना कशी वागणूक देतो यावर त्याचे खरे यश अवलंबून आहे अशी प्रतिक्रिया अशा प्रयोगाचे अभ्यासक रवींद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे. सगळ्या पातळीवर या रस्त्याने यश मिळवल्यास हा प्रयोग नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.


Comments

Top