HOME   टॉप स्टोरी

५०० रुपयांसाठी आईसमोर मारलं मुलाला, उपचार घेताना मृत्यू

सहापैकी एक आरोपी सापडला पाच फरार, शोधासाठी पथके रवाना


५०० रुपयांसाठी आईसमोर मारलं मुलाला, उपचार घेताना मृत्यू

लातूर: जुनं भांडण, व्यवसायातली स्पर्धा आणि नातेसंबंधातील तणाव याचा परिपाक म्हणून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना लातुरच्या संजयनगरातील असून यातला एक आरोपी सापडला आहे, बाकी पाच फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी खास पथके रवाना झाली आहेत. हे प्रकरण विवेकानंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
लातुरच्या संजयनगरातील ३६ वर्षे वयाचा शेख शादूल राजा बर्फगोळ्याचा व्यवसाय करायचा. त्याचे अनवर दस्तगीर, सय्यद हाजी अली सय्यद, दौला, बाळू मगर, सलीम नजीर सय्यद, शेख गुड्डू यांच्याशी नातेसंबंध, व्यावसायिक स्पर्धा आणि कुरबुरीही होत्या. दीड वर्षांपूर्वी ही सगळी मंडळी एका लग्नासाठी हैद्राबादला गेली होती. त्या ठिकाणी या सर्वांचे आपसात भांडण झाले होते. त्याचा राग अनेकांच्या मनात होता. आज शेख गुड्डूने शादूलला आपल्या घरी बोलावले आणि लाकडाने बेदम मारहाणीस सुरुवात केली. याच वेळी हाजीने शादूलच्या आईला फोन करुन बोलावून घेतले ‘तेरे बेटे को कैसा मार रहे है देखने को आ’ असा निरोप दिला. आईच्या समोर मुलाला लाकडी काठ्यांनी बेदम मारले. नंतर शादूलला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. शादूलला चार अपत्ये आहेत अशी माहिती विवेकानंद पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली. शादूलला प्रचंड मुका मार लागला होता. त्याच्या शरिराची मागची बाजू पूर्ण काळी निळी झाली होती. आरोपींनी शादूलला ५०० रुपये मागितले होते त्याने ते दिले नाहीत म्हणून हा प्रकार घडला असे सांगितले जाते पण यांच्यातल्या व्यावसायिक स्पर्धेतून निर्माण झालेल्या भांडनाने शादूलचा बळी घेतला असेही बोलले जात आहे.


Comments

Top