HOME   टॉप स्टोरी

मनपात कचरा, मनपाचा कचरा, कचर्‍याचे गिफ्ट!

प्रभाग नऊमधील नागरिक संतप्त, कचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणेविरुद्ध गंभीर तक्रार


लातूर: लातुरचे कचरा व्यवस्थापन सुधारते आहे असा दावा एकीकडे केला जातो तर दुसरीकडे कचरा रस्त्यावर जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कचरा नेणारी वाहनेच येत नाहीत. तर अनेक ठिकाणी ही वाहने येण्याआधीच नागरिक कचरा भस्म करतात! असाच प्रकार लातुरच्या प्रभाग नऊमध्ये अर्थात मित्रनगरात घडतोय. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी-नागरिकांनी आपल्या भागात साचलेला कचरा मनपाच्या दारात आणून टाकला. आयुक्तांच्या नावाने कचर्‍याची एक ‘पेटी’ही भेट केली! स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने अध्यक्ष मोहसीन खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सह आयुक्त त्र्यंबक कांबळे यांनी या आंदोलनकर्त्यांची भूमिका समजाऊन घेतली आणि तातडीने कचरा उचलण्याची व्यवस्था करीत असल्याचे सर्वांसमक्ष सांगितले.
यापुढे असाच प्रकार घडत गेल्यास प्रभागातील चारही नगरसेवकांना रोज कचरा भेट देण्याचा उपक्रम राबवला जाईल असा इशारा मोहसीन खान यांनी दिला आहे. प्रभाग नऊ सर्वात मोठा असून याचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, सपना किसवे, रेहाना बासले आणि राजा मनियार अशी थोर अनुभवी माणसे आहेत. प्रभाग नऊमध्ये मुख्य रस्त्याला कचरा उचलणारे ट्रॅक्टर नियमित येते पण बाकीच्या छोट्या गल्लीत कसलंच वाह्न फिरकर नाही. संबंधितांना वारंवार कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही असा आरोप मोहसीन खान, वसीम खान, वसीम तांबोळी, शादूल शेख, विकास करंजे, कुमार माळवदे, अजिंक्य माळवदे, याकूब शेख आणि हमीद शेख यांनी केला आहे.


Comments

Top