HOME   टॉप स्टोरी

टंचाईग्रस्त लातुरची ओळख टंचाईमुक्त करायची आहे!

आमीरखान, आलिया भट आणि वाटर कपच्या कार्यकर्त्यांचे फत्तेपुरात श्रमदान


लातूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन या संस्थेने श्रमदान चळवळ उभी केली आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील फत्तेपूर या गावी अभिनेता आमीर खान आणि आभिनेत्री अलिया भट यांनी श्रमदानात सहभाग नोंदवला. लातूर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला असून यामुळे फत्तेपूर गावातील नागरिकांमध्ये जोषपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. महिला, मुले-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सकाळी ८ पासून ते सकाळी १० पर्यंत श्रमदान करण्याचा संकल्प केला. आमीरखान, आलिया भट यांनीही आजच्या मोहिमेत श्रमदान केले. पाणी फाऊंडेशन अंतर्गत मागील ०३ वर्षांपासून या प्रकारची कामे महाराष्ट्रात केली जात आहेत. या मोहिमेत यावर्षी महाराष्ट्रातील ७५ तालुक्यांची निवड करण्यात आली असून त्यात लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा आणि देवणी या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी १३६ गावामध्ये हे काम झाले त्यानंतर दुसर्‍या वर्षी १३०० गावांमध्ये ही मोहिम राबवली गेली आणि यावर्षी तब्बल ४५०० इतक्या गावात काम होणार असल्याचे खान यांनी सांगितले. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या ०१ लाख ३६ हजार स्वंयसेवक श्रमदानात आपले सहभाग नोंदवत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आजच्या मोहिमेत लातूर, औसा, निलंगा या तालुक्यातील जनतेने आपला सहभाग नोंदवला. हे काम २१ मे पर्यंत चालणार आहे. यात आणखी सहभाग नोंदवावा असे आवाहन अलिया भट यांनी केले. ग्रामीण भागात जलक्रांती करण्याचे ध्येय पाणी फाऊंडेशन स्विकारले आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग ही तितकाच महत्वाचा आहे. ज्या गावांमध्ये श्रमदानाची कामे झाली आहेत त्यांची चाचपणी पुढील वर्षी याच दिवसांमध्ये केली जाईल असे खान यांनी सांगितले. लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. आपल्या जिल्ह्याचे नाव जगात गेले ते पाणी टंचाईमुळे. लातुरची ओळख टंचाईमुक्त म्हणून निर्माण करायची आहे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन ईटनकर यांनी सांगितले.


Comments

Top