HOME   टॉप स्टोरी

संभाजीरावांचा गट कुणाच्या बाजुने?

नेते तेवढे गट, गटांच्या राजकारणात लातूर भाजपा अग्रेसर, गिनिज बुकात होऊ शकते नोंद!


लातूर-उस्मानाबाद: बहुतांश ठिकाणच्या निवडणुकात अनपेक्षित यश मिळत गेल्याने प्रचंड आत्मविश्वासाने तेजीत आलेल्या भाजपाला आभाळ ठेंगणे वाटू लागले आहे. याचा निकाल येणार्‍या निवडणुकीत कळणारच आहे. पण आता या नेत्यांकडे सबुरी राहिलेली दिसत नाही हे लक्षात येत आहे. राष्ट्रवादीचे धस भाजपात आले अन भाजपातले कराड राष्ट्रवादीत गेले. या आवक जावकमुळेच संभाजीरावांचा गट अस्वस्थ झाला आणि अरविंदरावांना तिकिट न मिळाल्याने दुरावला असे बोलले जाते. यामुळं तिन्ही जिल्ह्यात संभाजीरावांना मानणारा गट नेमका कुणाकडे झुकेल हे सांगता येत नाही.
जादूची कांडी?
सगळ्याच पक्षाच्या मतदारांनी इमानदारीने आपापल्या उमेदवाराला मतदान केल्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे रमेश कराड शंभर टक्के निवडून येऊ शकतात पण बीड आणि उस्मानाबादच्या राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे. विधानपरिषदेच्या दोन्ही निवडणुकात लातुरचे दिलीपराव देशमुख निवडून आले, बीड-उस्मानाबादच्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने त्यांना साथ दिली. आता तिसर्‍यांदा पुन्हा लातुरलाच का संधी? असा सामान्य प्रश्न केला जात आहे. हा प्रश्न जाहीरपणे विचारला जात नसल्याने खुलासाही होत नाही, परिणामी त्याचा मतदानावर अनुचित परिणाम होऊ शकतो. ही सगळी वस्तूस्थिती लक्षात घेतल्यास युती आणि आघाडी यांचे उमेदवार आज तरी अडचणीत आहेत. ऐनवेळी जादूची कांडी ‘फिरल्यास’ काहीही चमत्कार होऊ शकतो.
सोशल मिडिया बहाद्दर!
ऐन युद्ध प्रसंगी सोशल मिडियावर संबंधित जळत्या विषयावर व्हिडीओ फिरवण्यात पटाईत असलेले पालकमंत्री संभाजीरावांनी विधान परिषद उमेदवारीवर भाष्य आणि आवाहन करणारा आपलाच व्हिडीओ व्हायरल केला. आम्ही कधीही आपल्या भावासाठी उमेदवारी मागितली नव्हती. मला महत्वाच्या कामामुळे बाहेर जावे लागले. बाकी आमचे सगळे मतदार जातीने धस यांचा अर्ज दाखल करताना हजर होते. या निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास त्यांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त केला आहे. मागे रेल रोको आंदोलनाच्या पूर्व संध्येला त्यांनी तीन गाड्या नव्याने सुरु होत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला होता. या तीन गाड्यांचं काय झालं हे लातुरकर चांगले जाणतात. आता कालच्या या व्हिडिओने काय साधले जाईल हे सांगण्याची गरज नाही. एकूणच लातुरची जनता सोशिक आहे त्याचा फायदा घेतला जातोय एवढे मात्र नक्की! निलंग्यात दिल्यासारखी आश्वासने लातुरात चालतील का? याचं उत्तर विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावरुन नक्कीच पहायला मिळेल.


Comments

Top