HOME   टॉप स्टोरी

कराड फॅक्टर नो मॅटर! आघाडी निवांत पण दक्ष!

आघाडीचे उमेदवार जगदाळे लातुरात, सगळ्या मतदारांवर लक्ष, दिलीपरावांची मदत


लातूर: लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद मतदारसंघात कराड यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत झाली असती पण ऐनवेळी कराडांनी माघार घेतली. याचा कसलाही परिणाम आमच्या उमेदवारावर होणार नाही असे विश्वासपूर्वक धीरज देशमुख यांनी सांगितले. ते मतदानानंतर बोलत होते. कराडांचं नाट्य लोक विसरुन गेले आता आघाडीचा बोलबाला आहे. आमच्यावर कसलाच परिणाम होणार नाही असे आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांनी सांगितले. जगदाळे कॉंग्रेसचं मतदान होईपर्यंत लातुरच्या कॉंग्रेस भवनात बसून होते. आ. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाला कुणी आणि केव्हा जायचं याची निती ठरवण्यात आली होती. त्यानुसार कॉंग्रेस मतदारांचं मतदान होईपर्यंत ते कॉंग्रेस भवनातून हलले नाहीत!
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु झालं. कडेकोट बंदोबस्तातील या तहसीलच्या मतदान केंद्रावर उमेदवार, मतदार, अधिकारी यांच्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला गेला नाही. पत्रकार आणि माध्यमांचे कॅमेरेही दूरच ठेवण्यात आले. पत्रकारांनी चौकशी केली असता उस्मानाबाद जिल्हाधिकार्‍यांचा आदेश आहे असे सांगण्यात आले. एक जिल्हाधिकारी दुसर्‍या जिल्ह्यात आदेश कसा देऊ शकतो या कोड्यातून अजून पत्रकार बाहेर पडले नाहीत! दरम्यान आपापली मते सांभाळंण्याचा, दगाफटका टाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजू करीत आहेत. लातुरच्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना अभ्यास सहलीच्या नावावर पर्यटनाला नेले होते. ते एकच्या सुमारास लातुरात पोचले, त्यांनी मतदानही केलं असं नगरसेवक गुरुनाथ मगे यांनी सांगितलं. कॉंग्रेसने आज सगळ्या मतदारांना सकाळी साडेनऊ वाजता कॉंग्रेस भवनमध्ये बोलावलं. पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्या उपस्थितीत मतदानाला पाठवलं. या मतदारांसोबत धीरज देशमुखही होते. त्यांचं मतदान झाल्यानंतर पाच-पाच नगरसेवकांच्या तुकड्या मतदानासाठी पाठवण्यात आल्या.
आमचा विजय नक्की आहे असं आघाडीच्या वतीनं सांगण्यात आलं. कुठेही नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा प्रयत्न झाला नाही पण डोळ्यात तेल घालून कॉंग्रेसची नेते मंडळी दक्ष होती. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात होता. म्हणूनच आज आ. दिलीपरावांच्या उपस्थितीत कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या मतदारांना बोलावण्यात आलं होतं. तिथून त्यांना मतदानासाठी पाठवण्यात आलं.


Comments

Top