HOME   टॉप स्टोरी

काश्मिरात लोकशाही नाही याचा खेद, सामान्यांना हवी शांतता

आ. काळे परतले लातुरात, काश्मिरचा रिपोर्ट राज्य आणि केंद्र सरकारला देणार


लातूर: पंचायतराज समितीचा काश्मीर दौरा आटोपून आ. विक्रम काळे आज लातुरात पोचले. अनंतनाग जिल्ह्यात त्यांच्या पथकावर अतिरेकी हल्ला झाला होता. त्यातुन ते बचावले. तरीही दौरा-काम करुनच ते परतले. काश्मिरातील सामान्यांना शांतता हवी आहे. पण काही लोकांना राजकीय स्वार्थापोटी काश्मीर स्वतंत्र हवा आहे. या लोकांमुळेच दहशतवादी कारवाया होत असतात. त्या जाणून बुजून केल्या जातात असे आ. विक्रम काळे यांनी सांगितले.
२१ ते २६ मे दरम्यान पंचायतराज समितीचा काश्मीर दौरा होता. सगळं काही सुरळीत सुरु असताना २३ मे रोजी अन्तनाग जिल्ह्यात मध्य वस्तीत पोलिस संरक्षणातून जात असतानाही अतिरेक्यांनी हल्ला केला. ग्रेनेड आणि बंदुकीच्या फैरी झाडल्या. मध्येच मोठे आवाज आले, टायर फुटले असावे असे वाटले, पोलिसांनी थांबू दिले नाही. शहराबाहेर आलो तेव्हा दोन गाड्यांचे टायर फुटले होते. गाडीच्या दारावर गोळ्या लागलेल्या होत्या. सुदैवाने आम्हाला काही झाले नाही पण हा हल्ला ज्या ठिकाणी झाला तिथे दहा ते बारा लोक जखमी झाल्याचे कळाले. पोलिसांनी संरक्षणात श्रीनगरला आणले, मग आम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली, झालेला प्रकार सांगितला, त्यांनी आम्हाला जादा कुमक दिली. घाबरु नका, दौरा पूर्ण करा अशी त्यांनी विनंती केली. दिलासा दिला. आम्हीही राहिलेला दौरा पूर्ण केला. तिथल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींचे काम पाहिले, तिथला शेतकरी, सामान्य माणसाला शांतता हवी आहे पण काही जणांना काश्मीर स्वतंत्र देश म्हणून हवा आहे. त्यामुळे राजकारणापोटी दहशतवादी कारवाया जाणून बुजून केल्या जातात. एवढं संरक्षण, लष्कर असताना अतिरेक्यांकडे शस्त्रे कुठून येतात हा प्रश्न आम्हाला पडला. काश्मिरात अजून लोकशाही रुजली नाही याचा खेद आहे. आमच्या अभ्यास दौर्‍याचा अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला देणार आहोत, काही उपाय-सूचनाही सांगणार आहोत असे आमदारांनी सांगितले.
Watch on Youtube also. Subscribe aajlatur.


Comments

Top