HOME   व्हिडिओ न्यूज

अंबुलगा कारखाना तात्काळ चालू करावा

अभय साळुंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, अभिमन्यू पवारांकडे निवेदन


लातूर: निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करावा, अशी मागणी अभय साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या मागणीचे निवेदन साळुंके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्याकडे सुपूर्द केले.
शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर बोलताना अभय साळुंके म्हणाले की, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी मराठवाड्यात सर्वाधिक गाळप क्षमता असणारा हा कारखाना होता. स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळे या परिसरात बॅरेजेस बांधण्यात आले. मांजरा आणि तेरणा नद्यांवर बांधण्यात आलेल्या या बॅरेजेस मुळे या भागात सिंचनाची सुविधा निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली. पण संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे २००६-०७ पासून हा कारखाना बंद आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उसाचे काय करावे हा प्रश्न सतावत आहे. शेतकरी अडचणीत आला आहे.
आज जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे संभाजी पाटील एक वर्षात कारखाना सुरू करतो असे आश्वासन देवून निवडून आले. पण आमदार झाल्यानंतर त्यांना आश्वासनाचा विसर पडला. शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करावा असे सांगण्याऐवजी ऊस लावुच नका असा सल्ला आता पालकमंत्री देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा आता हिरमोड झाला आहे. यासाठी पालकमंत्र्यांच्या निलंगा दौऱ्यात रीतसर वेळ घेवून शेतकऱ्यांसह त्यांच्या घरी जाणार आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, मतभेद जरुर असतील पण शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांना भेटण्यात मला कमीपणा वाटणार नाही. कारखाना चालू करण्याचे आश्वासन ते विसरले असून या आश्वासनाची त्यांना आठवण करून देणार आहे. सहकार मंत्र्यांनाही भेटून या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याची विनंती करणार आहे, असे अभय साळुंके म्हणाले.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. आता केवळ मुख्यमंत्र्यांवरच आशा आहे. त्यांनी लक्ष देऊन हा कारखाना सुरू करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले की, बंद असणारे कारखाने सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. कारखाने चालू करण्यासाठी निविदा काढण्यात येतात परंतु अनेकदा निविदांना प्रतिसाद मिळत नाही. कारखाना सुरू करण्यासाठी पालकमंत्री व सहकार मंत्र्यांनाही भेटून निवेदने देणे, आपली भुमिका पटवून देणे आवश्यक आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी आपण स्वतः व पालकमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. एक लातूरकर म्हणून त्यांना विनंती करू, साकडे घालू असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक आणि सभासदांनी यावेळी गर्दी केली होती.


Comments

Top