HOME   व्हिडिओ न्यूज

उप महापौरांनी अडवले बांधकाम परवाने, मनपाचे नुकसान- कैलास कांबळे

उप महापौरांविरुद्ध विभागीय आयुक्तांकडे कांबळे, युनूस मोमीन, गौरव काथवटे दाद मागणार


लातूर: महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. कर्मचार्‍यांचे पगार होत नाहीत, वीज बील भरता येत नाही अशा स्थितीत भाजपाच्या उप महापौरांनी बांधकाम परवाने थांबवले, मनपाचे उत्पन्न रोखले असा आरोप माजी उप महापौर कैलास कांबळे यांनी केला आहे. या विरोधात ते स्वत:, नगरसेवक युनूस मोमीन आणि गौरव काथवटे विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
मनपाच्या नगररचना विभागात कुलकर्णी नामक गृहस्थांची बांधकाम परवाना फाईल तीन महिन्यांपासून पडून आहे. चौकशी केली असता वाणिज्य किंवा औद्योगिक क्षेत्रात बांधकाम परवाने देऊ नये असे पत्र उप महापौरांनी दिल्याची माहिती मिळाली. पदाधिकार्‍यांना अशा प्रकारची कृती करण्याचा अधिकार कुणी दिला? कोणत्या नियमात दिला? असा प्रश्न कैलास कांबळे यांनी केला आहे. नगर रचनाकारांना काही कळत नाही म्हणून असे घडले का? असंही ते विचारतात. या प्रकरणामुळे मनपाचे ३३ लाखांचे नुकसान झाले आहे. मनपाची आर्थिक स्थिती एवढी बिकट असताना उप महापौर असे का करतात? त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Comments

Top