HOME   व्हिडिओ न्यूज

दीपक सूळ निघाले बाईक ढकलत, खड्डे मोजत, हजार रुपयांसाठी!

आज खड्डे बुजवण्याचा शेवटचा दिवस, सगळ्यांच्या डोळ्यात घातले अंजन!


लातूर: आज १५ डिसेंबर. सगळे खड्डे बुजणार म्हणून भोळी जनता आनंदात आणि खड्डे बुजले नाहीत, प्रत्येकी हजार रुपये मिळणार म्हणून जाणकार खुशीत. अशीच खुशी झाली होती लातुरचे माजी महापौर आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते दीपक सूळ यांना! त्यांनी आज सकाळी व्यंकटेश पुरी या मित्राला आपल्या बुलेटवर घेतलं. अंबाजोगाई मार्गावरील खड्ड्यांचा ‘आनंद’ घेतला. खड्डे मोजले. दोनशे फुटात चक्क ५५ निघाले. आता ५५ हजार बांधकाम विभागाला मागायचे या आनंदात निघाले पण खड्ड्यांच्या अवस्थेमुळे हाडं जेव्हा वाजायला लागली तेव्हा बाईकवरुन उतरले. खड्ड्यातून बाईकवर जाण्यापेक्षा बाईकच ढकलत बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे निघाले. पुढे काय झाले माहित नाही. किती पैसे मिळाले ते कळाले नाही. त्यावर इन्कम टॅक्स लागला का? पॅन कार्ड-आधार कार्ड दाखवावे लागले का याचाही तपशील मिळाला नाही. पैसे रोख मिळाले की खात्यावर जमा झाले तेही उमगले नाही. कारण बांधकाम मंत्र्यांनी खड्डा दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी घोषणा केली होती तेव्हा त्यांनी पण पैसे रोख मिळणार की खात्यावर जमा होणार हे सांगितले नव्हते!


Comments

Top