HOME   व्हिडिओ न्यूज

बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी आणले भानगडींवर नियंत्रण

गुन्ह्यांना बसला पायबंद, प्रवाशात विश्वासाचे वातावरण


लातूर: लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात १० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मुळातच असुरक्षित असलेल्या या स्थानकात ही यंत्रणा आल्याने तातडीने दोन गुन्हे उघड झाले. शिवाय स्थानकात घडणार्‍या बारीक सारीक भानगडींवर चांगलेच नियंत्रण आले आहे अशी माहिती बसस्थानक प्रमुख राघोबा सोमवंशी यांनी दिली. लातूर बसस्थानकात मुख्यत्वाने लातूर बाजारात आलेल्या शेतकर्‍यांची लूट होत असे. त्यानंतर बाहेरगावहून आलेल्या व्यापार्‍यांनाही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत असे. मंगळसूत्र, चैन हिसकावणे, पाकीट मारणे असेही प्रकार सतत घडत असत. सीटवर प्रवाशांनी ठेवलेल्या बॅगाही पळवल्या जायच्या. स्थानकात पोलिसांची उपस्थिती असतानाही असे प्रकार सतत घडायचे. आता स्थानकात ही नवी यंत्रणा आल्याने बर्‍याच गोष्टींना पायबंद बसला आहे. कॅमेरे बसवल्यानंतर दोन गुन्हे घडले, कॅमेर्‍यांमुळे दोन्ही घटनातील आरोपी सापडले, त्यांच्याकडून मुद्देमाल सहीसलामत जप्त करण्यात आला. या नव्याव्यवस्थेमुळे प्रवाशातही विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे असा दावा बसस्थानक प्रमुख राघोबा सोमवंशी यांनी केला.


Comments

Top