HOME   व्हिडिओ न्यूज

लाल परी धावू लागली, एसटी कर्मचार्‍यांचा संप मागे

दोन दिवस खाजगी वाहनातून प्रवाशांची सोय, स्थानक बनले जीप स्थानक


मुंबई-लातूर: दोन दिवसांपासून चालू असलेला राज्य परिवहन मंडळाचा संप अखेर काल रात्री इशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तडजोड झाल्याने मागे घेण्यात आला. हा संप कुठल्याही संघटनांनी पुकारला नव्हता. कर्मचार्‍यांनी तो उत्स्फूर्तपणे सुरु केला होता. जिकडे तिकडे जोरदार पाऊस आणि एसटी बंद राहिल्याने राज्यातले सामान्य कनजीवन विस्कळीत झाले होते. संपाच्या सुरुवातीला एसटीने केलेली पगारवाढ मागे घेऊन न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा सल्ला संपकरी कर्मचार्‍यांना दिला होता. काल रात्री बराच काळ चाललेल्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात आले. संपादरम्यान कर्मचार्‍यांवर झालेले किरकोळ गुन्हे मागे घेण्यात येतील मात्र गंभीर गुन्ह्यांसंदर्भात कारवाई केली जाणार आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते, कामगार संघटनांचे नेते संदीप शिंदे, हनुमंत ताटे, हिरेन रेडकर, श्रीरंग बरगे, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात दीर्घकाळ चर्चा झाली. एसटीने ४८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ केली आहे अशी माहिती रावते यांनी दिली. संपकाळात अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक झाली होती. औसा-लातूर बसही त्यातून सुटली नाही. यात बसच्या काचांचे नुकसान झाले, चालकाला दुखापतही झाली होती. अनेक ठिकाणी शेकडोवर संपकरी कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. हिंगोलीत कामावर आलेल्या भास्कर अवचार या कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर या आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.
लातुरचे बसस्थानक खाजगी प्रवासी जीप्सचा अड्डा!
दरम्यान प्रवाशांना वेठीला धरले जाऊ नये, प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून खाजगी वाहनातून प्रवाशांची सोय करावी असा आदेश सरकारने काढला. त्यानुसार आरटीओंच्या देखरेखीखाली बसस्थानकात काळी पिवळी आणि तत्सम खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना पाचारण करण्यात आले. यातून किमान जवळच्या टप्प्यातील गावांना जाण्याची सोय झाली. दोन दिवस याच पद्धतीने प्रवाशांची सोय करण्यात आली. यामुळे लातुरचे बसस्थानक खाजगी वाहनांचे स्थानक दिसून येत होते.


Comments

Top