HOME   लातूर न्यूज

चालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी मृत्यूंजय जप अन बंदला पुष्पांजली!


चालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी मृत्यूंजय जप अन बंदला पुष्पांजली!

लातूर शहरातील रहदारीला शिस्त लागत नाही, सगळ्यांवरच ताण येतो अशी ओरड नेहमी होते. वरिष्ठांच्या बैठकीत प्रत्येक वेळी हा विषयही निघतो. पण प्रगती होत नाही हा अनुभव आहे. आजमितीला लातूर शहरातल्या वेगवेगळ्या चौकात मिळून २१ सिग्नल यंत्रणा असल्याचे सांगण्यात येते. पण फक्त लोकमान्य टिळक-अशोक हॉटेल चौकातील यंत्रणा कशीबशी चालू आहे. काल परवा वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी हनुमान चौकात स्वत: थांबून या चौकातली यंत्रणा काही वेळ चालवली. खर्‍या अर्थाने शहराची रहदारी टिळक चौकातलीच सिग्नल यंत्रणा सांभाळत आहे. याकडे सगळ्यांचेच दूर्लक्ष झाले असून रस्त्यावरुन येजा करणार्‍यांनाही त्याचे काही वाटत नाही आणि एवढ्या दिवसांपासून सिग्नल यंत्रणेचे तीन तेरा वाजूनही जबाबदार व्यक्तींचेही लक्ष जात नाही. या सगळ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आज ओंकार सोनवणे मित्र परिवाराने केला. टिळक चौकात सुरु असलेली एकमेव सिग्नल यंत्रणा कायमस्वरुपी जीवंत रहावी, त्याला दिर्घायुष्य लाभावे यासाठी या मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी मृत्यूंजय जप केला, विधिवत आरती केली. काल परवाच कोमात गेलेल्या मिनी मार्केटच्या सिग्नलला लवकर शुद्धीवर येण्यासाठी पुष्पहार घातले.
लवकरात लवकर शहरातील ही रहदारी, वाहतूक सुरळीत करावी, सिग्नल्स चालू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मित्र परिवाराचे प्रमुख ओंकार सोनवणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे. यावेळी पवन जगताप, आकाश जाधव, दीपक रेड्डी, दीपक मुळे, कुणाल शृंगारे, आशिष साठे, दीपक मुळे, आकाश बावगे, आदिनाथ पवार, संकेत भालके, अभिषेक बेलुरे, अक्षय साळुंके, ऋषिकेश चन्नागिरे, मुस्तकील सय्यद, सोहेल शेख, साहिल खान, संविधान कांबळे, गंगाधर इंगळे, प्रवीण मोरे, मुस्तकील पटेल, जिशान शेख, एमएच शेख उपस्थित होते.


Comments

Top