HOME   टॉप स्टोरी

डॉल्बी वाजवणारच आमदारांच्या बैठकीत जाहीर निर्धार

केसेस झाल्या तर आमची वकील मंडळी साथ देईल आमदारांचे आश्वासन


डॉल्बी वाजवणारच आमदारांच्या बैठकीत जाहीर निर्धार

लातूर : लातुरच्या परंपरेला, साजेशा उत्साहात आपल्या सामाजिक सोहार्दपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केले. यासाठी गणेश भक्तांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. अती उत्साह दाखवत अनावश्यक वक्तव्य करुन गणेश भक्तांचा अवमान करणे योग्य नाही, सत्तेत आणि अधिकारी पदावर असलेल्यांनी जबाबदारीनेच वागायला हवे असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले. शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित देशमुख बोलत होते. दरम्यान परवानगी परवानगी मिळो ना मिळो आम्ही डॉल्बी लावणारच, कारवाईचं बघून घेऊ असा निर्धार काही गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनी केला. केसेस झाल्या तर आमची वकील मंडळी तुम्हाला साथ देईल असे आश्वासन आ. अमित देशमुख यांनी दिलं.
प्रारंभी पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात येणाऱ्या अडचणी मांडल्या. मंडळाला परवानगी देताना होणारी दिरंगाई, जाचक नियम, रस्त्यांची दुरावस्था, स्ट्रीट-लाईट व विद्युत पुरवठयातील अडचणी मांडल्या. अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत समस्या ऐकूनच घेतल्या नाहीत, उलट धमक्या दिल्याची तक्रार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
लातुरात गणेशोत्सवाची चांगली परंपरा आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. येथे लोकशिक्षणाचे साधन म्हणुनच गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रबोधन करणारे देखावे आणि तसे कार्यक्रमही आयोजित केले जातात. कधीही अप्रिय घटना घडल्याचा इतिहास नाही. लातुरकर सयंमी आहेत. ते कधी चुकत नाहीत पण अन्याय आणि दडपशाही सहनही करीत नाहीत असेही अमित देशमुख म्हणाले.
रस्त्यावरील खडडे, विजेची व्यवस्था करण्यासाठी दीपक सूळ, अशोक गोविंदपूरकर मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करतील असे देशमुख यांनी सांगितले. गणेशमंडळाला परवाना लवकर मिळण्यासाठी, डॉल्बी संदर्भात ॲड.व्यंकट बेद्रे, ॲड. किरण जाधव योग्य मार्ग काढतील असेही अमित देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असतांना सर्व सोयी सुविधा न मागता मिळत होत्या, परंतु आता गणेशभक्तांना अडचणी सांगाव्या लागत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बैठकीत शाम जाधव, नंदकुमार पोपडे, त्र्यंबक स्वामी, शाम जाधव, चंदू बगडे, ऋषिकेश कुलकर्णी, प्रविण देशमुख, गजानन साळुंके, वैभव पुरी, असिफ बागवान, पवन तिवारी, शुभम वानखेडे, नवाब अन्सारी, मंगेश भुजबळ, बालाप्रसाद धोत्रे, ऋषिकेश पवार, बालाजी जाधव, बालाजी गडदे, स्वप्नील देशमुख, सुनील चामे, बालाजी सोमवंशी या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी व्यंकट बेद्रे, मोईज शेख, दीपक सूळ, इनुस मोमीन, कैलाश कांबळे, व्यंकटेश पुरी उपस्थित होते


Comments

Top