HOME   लातूर न्यूज

देवणी न्यायालय इमारतीच्या बांधकाम निधीस मंजुरी

पालकमंत्री निलंगेकरांच्या पाठपुराव्याला यश


देवणी न्यायालय इमारतीच्या बांधकाम निधीस मंजुरी

लातूरः निलंगा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यासाठी देवणी येथे न्यायालयाची इमारत असावी अशी मागणी सातत्याने होत होती. याबाबत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलेले असून इमारत बांधकामाच्या निधीस मंजूरी मिळालेली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी ०९ कोटी ९६ लाख ६४ हजार रूपये निधीच्या मंजुरीची तरतूद करण्यात आली असून याबाबत शासन आदेशही काढण्यात आलेले आहेत.
निलंगा मतदारसंघात निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. तिन्ही तालुक्यातील विकासकामासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर सातत्याने आग्रही असून याबाबत शासन स्तरावर त्यांच्याकडून पाठपुरावाही करण्यात येतो. देवणी येथे न्यायालयासाठी नवीन इमारत असावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती. या मागणीनुसार पालकमंत्री निलंगेकर यांनी देवणीच्या न्यायालयीन इमारतीसाठी निधीची तरतुद करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने करत होते. पालकमंत्री निलंगेकरांच्या या पाठपुराव्याला यश आलेले असून देवणी न्यायालयीन इमारतीसाठी ०९ कोटी ९६ लाख ६४ हजार रूपयांच्या निधीस मंजुरी मिळून त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. याबाबत शासन आदेशही काढण्यात आलेले आहेत.
ही न्यायालयीन इमारत सुसज्ज होणार असून इतर मुलभूत सुविधाही या इमारतीत राहणार आहेत. न्यायालयीन इमारतीसाठी ०४ कोटी २३ लाख ९५ हजार रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली असून आवार भिंत, ड्रेनेज, फर्निचर, अग्नीप्रतिबंधक यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टींग, बगीचा,वाहनतळ, सौर ऊर्जा प्रणाली, वातानुकूलित यंत्रणा, वॉटर स्टोअरेज व पंपहाऊस आदी सुविधा सुसज्ज असाव्यात यासाठी निधीची तरतूद झालेली आहे. सदर निधी तरतूद झाल्याने देवणी न्यायालयीन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे. न्यायालयीन इमारतीसाठी निधी मंजूर केल्याबद्दल देवणी तालुक्यातील जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.


Comments

Top