HOME   लातूर न्यूज

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा

शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, आ. अमित देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा

लातूर: रेणापूर तालुक्यातील बिटरगाव, कामखेडा, टाकळगाव, फरदपूर व परिसरात झालेल्या गारपिटीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांच्या नुकसानीची माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यांना दिलासा दिला गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.
गुरुवारी दुपारी लातूर जिल्ह्यातील अनेक गावात वादळी वारा, गारपीट सह पाऊस झाला. बीटरगाव परिसरात तर आस्मानी संकट कोसळल्याचे दिसून आले. एक तासाच्या वादळी पावसात होत्याचे नव्हते झाले. सर्वच उभी पिके भुईसपाट झाली आहेत. काढणीस आलेले सोयाबीन झडून गेले आहे. झाडे, गोठे, घर यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच आवर्षणामुळे अडचणीत असलेला शेतकरी या आस्मानी संकटाने पुरता कोलमडला आहे. आमदार देशमुख यांनी आपदग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली, शेतकऱ्यांना दिलासा दिला.
रेणापूर तालुक्यातील भेटीच्या वेळी त्यांच्या समवेत लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद बोराडे, रेणापुर तालुका अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, रेणा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सर्जेराव मोरे, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रचूड चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top