HOME   लातूर न्यूज

मातृहस्ते भोजनाचा आगळावेगळा आस्वाद!

पूर्वांचल विद्यार्थ्यांना १५० कुटूंबातील घरातील भोजन


मातृहस्ते भोजनाचा आगळावेगळा आस्वाद!

लातूर: मेघालय, नागालॅण्ड आदी पूर्वांचलातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लातूरातील १५० कुटूंबातील मातांनी स्वतःच्या हस्ते बनवलेले भोजन भरवण्याचा आगळा-वेगळा संस्काराचा कार्यक्रम लातूरात संपन्न झाला. यावेळी या विद्यार्थ्यांनी तृप्तीची ढेकर देत घरच्या भोजनाचा आनंद उपभोगला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पूर्वांचल विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रात मेघालय, नागालॅण्ड व मणिपूर येथील विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणार्‍या चिपळूण, सांगली, डोंबिवली, चिंचवड, नाशिक, पुणे, संभाजीनगर, लातूर येथील वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वसतिगृह चालविली जातात, या वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे पाच दिवसीय शिबीर लातूरात आयोजित करण्यात आले आहे. शिबीराच्या चवथ्या दिवशी सायंकाळी देशीकेंद्र विद्यालयात मातृहस्ते भोजन या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती.
शिबीर प्रमुख अतुल ठोंबरे व प्रकल्प पालक योगेश तोतला यांच्या सूचनेवरुन सौ.सीमा अयाचित, सौ. निलिमा अंधोरीकर, सौ. गायत्री तोतला, सौ. शीतल तांदळे, सौ. रांगिणी देशपांडे, सौ. मंजुश्री बाखलीकर, सौ. नलिनी पत्की, डॉ. संजिवनी शिरुरे, सौ. सुनिता पाटील, सौ. प्रज्ञा कुलकर्णी, सौ. माधुरी औरंगाबादकर, सौ. गीता ठोंबरे, सौ. संध्या देशमुख, सौ. प्रिती तापडिया, सौ. योगिनी खरे, सौ. शुभांगी कुलकर्णी या महिलांनी लातूरातील १५० कुटूंबात जाऊन या योजनेची माहिती दिली आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांच्या उपस्थित सुमारे साडेतीन हजार किलोमीटर अंतरावरुन शिक्षणासाठी महाराष्ट्रात आलेल्या या मुला-मुलींना स्वतःच्या हस्ते बनवलेले भोजन भरवावे अशी विनंती केली. त्यासाठी हस्तपत्रक वितरीत करुनही त्यांनी या रचनेची माहिती दिली.
सायंकाळी देशीकेंद्र विद्यालयात चंद्रप्रकाशात व बॅटरीच्या प्रकाशझोतात या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मग यासाठी १५० मातांनी दिपावलीत बनवलेले लाडू, चकल्या, करंजी, चिवडा यापासून ते ताजी बनवलेली धपाटी, पूरणपोळी, चपाती, पुरीभाजी, विविध भाज्या, दाल-खिचडी, गुलाबजाम आदी पक्वानांचा बेत केला होता. माता-भगिनींनी पूर्वांचलातील मुले व मुलींना आपल्या जवळ बसवून त्यांच्या ताटाभोवती रांगोळी काढून, स्वतःच्या हस्ते भोजन भरवले. काही जणांनी या मुलांना भेटवस्तुही दिल्या. अतिशय मंगलमय वातावरणात दीपावली किंवा एखादा सण अनुभवावा तसा प्रसंग अनुभवत हजारो किलो मीटरवरुन आपल्या आई-वडिलांना सोडून आलेल्या या विद्यार्थ्यांनी समाधानाने तृप्तीची ढेकर देत गारो, खॉंसी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत सगळ्यांना धन्यवाद देत आपल्या निवासस्थानाकडे कूच केली.
विवेकानंद रुग्णालयातील अधीक्षक डॉ. मीरा नागावकर, पूर्वांचल शिबीराच्या वर्ग कार्यवाहिका सौ. वर्षा जोशी, सौ.सीमा अयाचित, संजय काटे, शरदभाऊ खाडिलकर, अतुल ठोंबरे, योगेश तोतला यांच्या प्रमुख उपस्थितीत या मातृहस्ते भोजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ. रागिणी देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.


Comments

Top