HOME   लातूर न्यूज

परप्रांतीय बाल पाहूण्यांचे लातूरकरांनी केले आदरातिथ्य

३५८ कुटुंबांकडून बाल पाहुण्यांचा पाहुणचार; लातूर शहरातील मंदिर, मस्जिदीचे घडविले दर्शन


परप्रांतीय बाल पाहूण्यांचे लातूरकरांनी केले आदरातिथ्य

लातूर : राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात परराज्यातून पाचशेच्या वर बालपाहुणे आले असून, त्यांचे आदरातिथ्य लातूरकरांनी मोठ्या उत्साहात केले. शहरातील ३५८ कुटुंबांकडे या बालपाहुण्यांचा गेल्या तीन दिवसांपासून मुक्काम असून, त्यांना महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांसह त्यांच्या आवडी-निवडीनुसार पाहूणचार केला जात आहे. यामुळे दिवाळीनंतर दिवाळीचा उत्साह शहरात आहे.
विलासराव देशमुख फाऊंडेशन आणि राष्ट्रीय युवा योजना नवी दिल्लीच्या वतीने गोल्डक्रेस्ट हायच्या प्रांगणात सुरू असलेल्या १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवासाठी देशभरातील १८ प्रांतातील बालके लातुरात मुक्कामी आहेत. केरळ, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांतील मुलांचा त्यात समावेश आहे. या बाल पाहुण्यांच्या पाहूणचारासाठी या कुटुंबांकडून कुठलीही कसर ठेवली जात नाही. त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यांना भरविण्यापर्यंतची काळजी लातुरातील कुटुंबांनी घेतली आहे. विविध प्रांत, जात-धर्मातील हे बाल पाहुणे वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामुळे या माध्यमातून लातुरात राष्ट्रीय एकात्मेचे वातावरण आहे. मणिपूर, केरळ, पंजाब, त्रिपुरा आदी राज्यांतील बालके पाच दिवसांचा प्रवास करून लातुरात आली आहेत. त्यांच्या आवडीच्या पदार्थांबरोबर महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांच्या पाहूणचारासाठी केले जात आहे. विशेष म्हणजे दिवाळीनंतर दिवाळीच या कुटुंबामध्ये साजरी होत आहे. विविध जाती-धर्मातील व संस्कृतीतील हे पाहूणे लातूर शहरातील कुटुंबांमध्ये एकरुप झाले आहेत. विविधतेतून एकतेचा संदेश यामधून समाजाला मिळाला.
घडविले लातूर दर्शन...
शहरातील ३५८ कुटुंबांकडे विविध प्रांतातील बाल पाहुणे मुक्कामाला आहेत. त्यांना या कुटुंबाकडून लातुरातील महत्वाची स्थळे दाखविली जात आहेत. विशेष म्हणजे गंजगोलाई, श्री अष्टविनायक मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, नाना-नानी पार्क, विराट हनुमान, बालाजी मंदिर तसेच गंजगोलाई परिसरातील मस्जिद आदी प्रार्थना स्थळांना या बाल पाहुण्यांच्या भेटी घडविल्या जात आहेत. मुस्लिम समाजातील मुलं हिंदू कुटुंबात मुक्कामी आहेत. त्यांना नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये नेले जात आहे. तर हिंदू समाजातील मुले मुस्लिम कुटुंबात मुक्कामी आहेत. या कुटुंबाकडून त्यांना शहरातील मंदिरांचे दर्शन घडवून आणण्यात आले.


Comments

Top