HOME   लातूर न्यूज

शासकीय यंत्रणांनी अल्पसंख्यांक समाजाला लाभ द्यावेत

- अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख


शासकीय यंत्रणांनी अल्पसंख्यांक समाजाला लाभ द्यावेत

लातूर: अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या समाजातील लोकांना त्यांच्यासाठी शासनाने निर्माण केलेल्या प्रत्येक योजनांचा लाभ देऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचे काम करण्याची प्रत्येक शासकीय विभागाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्यांक विकास विभागातंर्गत विविध योजनांच्या आढावा प्रसंगी शेख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य नजीम खान पठाण, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी शंकर बरुरे आदिंसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेख पुढे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाचा विकास म्हणजे संपूर्ण राज्याचा विकास आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून या कामात शासन ही पूर्णपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अल्पसंख्यांक समाजातील लोकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला पाहीजे असेही ते म्हणाले.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून प्रत्येक जिल्हयातील वक्फ बोर्डासाठी एक पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचे कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचा कारभार अधिक गतीमान होणार आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या जमीनीवर ज्या ठिकाणी अतीक्रमण झालेले आहे अथवा कोणीही बोर्डाच्या जमीनीच्या अनाधीकृत कब्जा घेतला असेल अशा लोकांवर त्वरीत कठोर कारवाई जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने करावी, अशी सूचना शेख यांनी केली.


Comments

Top