HOME   लातूर न्यूज

आज लातुरात विश्‍व हिंदू परिषदेची आज हुंकार सभा

बंकटलालच्या भव्य मैदानावर जोरदार तयारी सुरु


आज लातुरात विश्‍व हिंदू परिषदेची आज हुंकार सभा

लातूर: आज लातूर शहरातील बंकटलाल शाळेच्या मैदानावर विश्व हिंदू परिषदेची हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी पाच वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी भव्यदिव्य तयारीही सुरु आहे.
देशातील हिंदुधर्मीयांसाठी अस्मितेचा विषय असणार्‍या राम मंदीराच्या उभारणीत अनेक अडथळे येत आहेत. या अडथळ्यांची शर्यत पार करून कोणत्याही परिस्थितीत राम मंदीर उभारावे अशी भूमिका प्रत्येक हिंदूंची आहे. ही भूमिका खुल्या व्यासपीठावर जाहीरपणे सांगण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभा होत आहेत. लातुरात आज सायंकाळी पाच वाजता बंकटलाल विद्यालयाच्या मैदानावर हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर हे संबोधित करणार आहेत.
अयोध्या येथील रामजन्मभूमीवर राम मंदीर उभारण्यात यावे यासाठी विश्‍व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटना अनेक वर्षापासून संघर्ष उभा करून यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. राम मंदीराचा मुद्दा आता अंतिम टप्प्यात आलेला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदीरचा विषय आमच्याकरीता प्राथमिकतेचा नाही असे सांगून सदर प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यात ठेवलेली आहे. यामुळे तमाम हिंदुंची घोर निराशा झालेली असून राम मंदीर उभारण्याकरीता हिंदू समाजाने आता एकत्रित येण्याची वेळ आलेली आहे. याबाबत सत्य परिस्थिती विषद करून राम मंदीर उभा करण्याकरीता विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या हुंकार सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर हे संबोधित करणार आहेत. या सभेसाठी विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह साधु-संतांचीही उपस्थिती राहणार आहे. या हुंकार सभेला जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुजित देशपांडे, जिल्हाध्यक्ष नंदकुमार कोनाळे, जिल्हा मंत्री विलास खिंडे, महानगरमंत्री प्रणव रायचूरकर, बालाप्रसाद बाहेती, किशोर कुलकर्णी, मंगेश तिडके, खंडागळे आदींसह विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.


Comments

Top