HOME   लातूर न्यूज

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकारी परिषदेवर अॅड. त्र्यंबकदास झंवर यांची निवड

सात सदस्यांच्या मान्यवरात झंवर, श्री श्री रवीशंकर यांनी केली निवड


आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकारी परिषदेवर अॅड. त्र्यंबकदास झंवर यांची निवड

लातूर: लातूर येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अॅड. त्र्यंबकदास झंवर यांची आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारी परिषदेवर निवड करण्यात आली आहे. ही निवड श्री श्री रविशंकर यांनी केली आहे. या समितीवर एकूण सात सदस्य असून यांत प्रमुख उद्योगपती, समाजसेवक यांचा समावेश आहे. या समितीमार्फत महाराष्ट्रातील विविध उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने राज्यभर अनेक समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. यांमध्ये योगसाधना, अध्यात्मिक उन्नतीसाठीचे उपक्रम याबरोबरच जलसंधारण, वृक्षारोपण, विषमुक्त अन्न, उन्नत शेती, शिक्षण प्रसार, आरोग्य चळवळी, यासारख्या कार्यांचा समावेश आहे. यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास १०० कोटींहून अधिक खर्च केला जातो. लातूर जिल्ह्यात जलसंधारणाचे काम सन २०१३ मध्ये सुरु झाले. त्याचा चांगला फायदाही झाला. तावरजा नदीचे २८ किलोमीटर रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. मांजरा, तेरणा, रेणा आदी नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ०१ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्याचप्रमाणे मांजरा नदीच्या काठावरील गायरान परिसरात ४५ हजार एकरांमध्ये २३ हजार झाडे लावण्यात आली आहेत. ठिबक सिंचनाने ही झाडे जिवंत ठेवण्यात आली आहेत. जलसंधारणाची चळवळ जिल्ह्यात १०० हून अधिक गावांत पोहोचली आहे. विषमुक्त अन्नाच्या निर्मितीसाठी तीन हजारांहून अधिक शेतकरी सेंद्रिय शेती करीत आहेत. यापुढे विषमुक्त आहार व निरोगी जीवन यासाठी काम केले जाणार असल्याची माहिती अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी दिली. दुष्काळग्रस्त मराठवाडा परिसरातील सर्व जिल्ह्यांत, विदर्भात व महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांतही अनेक समाजोपयोगी कामे सुरु आहेत. या समितीवरील निवड हा श्री श्री रविशंकरजी यांचा आशीर्वाद असून याचा जास्तीत जास्त उपयोग लातूर व मराठवाड्यासाठी कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी दिली आहे. त्यांच्या या निवडीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.


Comments

Top