HOME   लातूर न्यूज

लिंगायत धर्म मान्यतेसाठी पाठपुरावा करणार

दिल्लीतल्या आंदोलनस्थळी दिली खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट


लिंगायत धर्म मान्यतेसाठी पाठपुरावा करणार

लातूर: बाराव्या शतकात महात्मा बसवेश्‍वरांनी रुढी-परंपरांना मोडीत काढण्यासाठी स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा संविधानिक दर्जा मिळण्यासाठी मी संसदेत प्रश्‍न मांडून पाठपुरावा करणार आहे, असे आश्‍वासन खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केले. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा संविधानिक दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी जावून डॉ. सुनील गायकवाड यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुडलसंगमच्या महिला जगद्गुरू माते महादेवीजी, भालकीचे बसवलिंग पट्टदेवरू, डॉ. अन्नपूर्णा अक्का, डॉ. गंगांबिके अक्का, चन्नबसव शिवयोगी, दिल्ली येथील विशेष सचिव अमरनाथ तलवाडे उपस्थित होते. यावेळी डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, महात्मा बसवेश्‍वरांनी बाराव्या शतकात कर्मकांड, जुन्या रुढी-परंपरा, जातीप्रथेला छेद देत स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली. समानतेच्या विचारावर चालणार्‍या त्यांच्या या धर्माचे अनेकजण पाईक बनले. त्यामुळे लिंगायत धर्म हा बाराव्या शतकातच अस्तित्वात आलेला आहे. आता त्याला संविधानिक दर्जा मिळण्याची गरज आहे. तो मिळावा, यासाठी मी संसदेत प्रश्‍न मांडून लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन डॉ. सुनील गायकवाड यांनी यावेळी दिले.


Comments

Top