HOME   लातूर न्यूज

पाण्याच्या मीटर खरेदीचा मंजुरी प्रस्ताव प्रलंबित

सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आला- विक्रांत गोजमगुंडे


पाण्याच्या मीटर खरेदीचा मंजुरी प्रस्ताव प्रलंबित

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नळाला मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला व या करिता निविदाही काढण्यात आली. नागरिकांकडून मीटरचे शुल्क वसूल करून ठेकेदारास देण्याकरिता ही निविदा मागविन्यात आली होती. परंतु तब्बल ०९ महिन्यानंतर निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेस घेण्यात आली होती. नगरसेवकांनी सजगतेने हरकत घेतल्याने निविदाधारकाशी फेर वाटाघाटी करून विषय पुढील बैठकीत चर्चेत घ्यावा असा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाने मे २०१८ मध्ये मंजुरी साठी पाठविलेला प्रस्ताव ९ महिन्यानंतर विषय पत्रिकेवर घेणे संशयास्पद असून घरगुती वापरासाठी लागणारे १५ मिमी चे मीटर बाजारात केवळ ११५० रुपयांना उपलब्ध असताना तेच मीटर २८४० रुपयांना व २० मिमी करिताचे मीटर बाजारात २०५० रुपयांना उपलब्ध असताना तेच मीटर ३५०० रुपयांना खरेदी करण्याचा घाट घालण्यात आला होता असा आरोप करीत शासन निर्णयानुसार कोणतीही निविदा प्रक्रिया ०४ महिन्यात पूर्ण न झाल्यास फेर निविदा काढावी लागते, सदरची निविदा डिसेंबर २०१७ साली काढण्यात आली होती व निविदेतील दर हे बाजारभावाच्या दुपटीहून अधिक असल्याने निविदा धारकाशी फेर वाटाघाटी न करता निविदा प्रक्रिया पूर्ण पणे रद्द करून नव्याने निविदा काढाव्यात व लातूर करांची होणारी लूट थांबवावीअशी मागणी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपा आयुक्त यांच्या कडे केली आहे. सत्ताधाऱ्यांचा निविदेआडून भ्रष्टाचार करण्याच्या अयशस्वी प्रयत्नामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून मनपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे मत व्यक्त करत निविदा कालावधी उलटून गेल्यानंतरही जाणूनबुजून आर्थिक लाभ डोळ्यासमोर ठेवत निविदा मंजूर करून मनपा व लातूरकरांची लूट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता असा आरोप त्यांनी केला. तसेच सजगता दाखविणाऱ्या नगरसेवकांचे अभिनंदन व्यक्त केले.


Comments

Top