logo

HOME   लातूर न्यूज

प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी लातुरात

स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेत मुक्त संवादाचे आयोजन

प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी लातुरात

लातूर: स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि स्व. हरिरामजी भट्टड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दयानंद सभागृहात प्रख्यात लेखक प्रशांत दळवी आणि ख्यातनाम सिने-नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मराठी नाटक व चित्रपट क्षेत्रात वेगळी वाट निवडून त्यावर स्वतःची मोहर उमटवली आहे. विचारांशी तडजोड न करता व्यावसायिक यश मिळवता येते हे या दोघांनी 'चारचौघी, ध्यानीमनी, चाहूल,, सेलेब्रेशन’ या नाटकांच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीला नाविन्याची धुमारे फुटले. तर बिनधास्त, कायद्याचं बोला, तुकाराम, फॅमिली कट्टा, आजचा दिवस माझा या चित्रपटांतूनही त्यांनी थिल्लरपणाला थारा न देता सूचकतेने प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडल्याचे आपण पाहिले आहे. याच काळात प्रा. अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'गांधी विरुद्ध गांधी, व ' डॉक्टर तुम्ही सुद्धा, या नाटकांची देशभरातील जाणकारांनी प्रशंसा केली. अनेक भाषांत त्यांचे अनुवाद झाले. प्रतिभावंत लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगांत’ या नाट्यत्रयींना अभिजाततेचा स्पर्श झाल्यामुळे तब्बल वीस वर्षांचा खंड पडल्यावर नव्याने ती सादर झाली तेव्हा प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तात्कालिकता, चंचलता हे वैशिष्ट्य मानले जात असणाऱ्या सध्याच्या काळात बाजारपेठेचा विचार न करता शेक्सपियरच्या 'हॅमलेट’ला सादर करण्याचे धैर्य चंद्रकांत कुलकर्णी यांनी दाखवले आणि त्यालाही उदंड दाद मिळाली.
मराठवाड्यातील पाळेमुळे असलेले प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे मुंबईत का गेले?, गॉडफादर नसताना पाय रोवून उभे कसे राहिले?, नाटक व चित्रपटाचा विषय व कथावस्तू कशी ठरते?, त्यांना कोणते अडथळे पार पाडावे लागतात?, नाटक व चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक व अभिनेत्यांसोबत काम करताना त्यांना कसे अनुभव आले? अशा अनेक विषयांवर गप्पा मारण्याकरिता, प्रशांत दळवी व चंद्रकांत कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवाद आयोजित केला आहे. दयानंद सभागृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या विशेष कार्यक्रमास लातूरकरांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने श्रीनिवास लाहोटी, श्रीमती सुमती जगताप तसेच स्व. हरिरामजी भट्टड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. सुरेश भट्टड यांनी केले आहे.


Comments

Top