HOME   लातूर न्यूज

शिवलीच्या हनुमान यात्रेस जोरदार प्रतिसाद

नवसफेडीसाठी गर्दी, राज्यभरातून प्रतिसाद, नामवंत किर्तनकारांचा महोत्सव


शिवलीच्या हनुमान यात्रेस जोरदार प्रतिसाद

लातूर: लातूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालूक्यातील शिवली येथील नवसाला पावणार्‍या जागृत देवस्थान श्री हनुमान यात्रेस प्रारंभ झाला असून या यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा संयोजकाच्या वतीने देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पुरातन काळात मंदिरात लावण्यात आलेला दिवा आजही पाजळत असल्याने या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हयासह राज्यातील अनेक भाविक आपला नवस पूर्ण करण्यासाठी शिवलीत दाखल होत असल्याने दिवसेंदिवस या हनुमान देवस्थानला मोठे महत्व प्राप्त होत आहे.
औसा तालूक्यातील शिवली या गावात श्री हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणार्‍या शनिवारपासून यात्रा भरते. या वर्षी हनुमान जयंती शुक्रवारी आली असल्याने शिवलीच्या हनुमान यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला आहे. विशेष म्हणजे येथील मंदीरामध्ये पुरातन काळापासून पाजळत असलेला दिवा आजही विझलेला नाही. याची ख्याती सर्वदूर असल्याने राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी आवर्जून शिवलीत येतात. त्यामुळे नवसाला पावणारा हनुमान म्हणून राज्यभर या देवस्थानची ख्याती झाली आहे. हनुमान यात्रेनिमित्त परंपरागत चालत आलेल्या रुढी प्रमाणे शनिवारी पहाटे गावातील प्रत्येक स्त्री-पुरुष आपल्या राहत्या घरापासून मंदीरापर्यंत स्नान करून ओल्या कपड्यावर मंदीरापर्यंत दंडवत घालत येतात. पहाटे ४ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत दह्या दुधाचा अभिषेक केला जातो. याच दरम्यान हनुमानाच्या मुर्तीस सोन्या-चांदीने मढविले जाते. त्यानंतर दुपारी गावातील तसेच लग्न होवून सासरी गेलेल्या मुली, महिला आपल्या घरापासून हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत येवून मंदीराला लोटांगण घालतात. दिवसभर मंदिराभोवती यामुळे गर्दी वाढलेली असते. संपूर्ण परिसर जय हनुमानच्या गजरात दुमदुमुन जातो.
राज्यातील नामवंत भारूडकर रविवारी सकाळी दाखल होतात. यानंतर भारूडाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. संध्याकाळी सहा नंतर भाविक भक्त बोललेल्या नवसाची उतराई करतात. नवसाची उत्तराई झाल्यानंतर चुरमुरे, नारळ, गुळाची ढेप फोडून प्रसाद म्हणून भाविकांना वाटला जातो. रात्री अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये रसिकांसाठी ‘माय बोली महारष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या वर्षांपासून महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचा किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने या किर्तनाचा लाभ हजारो भाविक घेत आहेत. यामध्ये किर्तनकार इंदोरीकर महाराज, परामजी ढोक महाराज, पपठाडे महाराज आदी नामवंत किर्तनकरांचा समावेश आहे. सोमवारी दुपारी पाचनंतर नामवंत मंल्लांचा कुस्त्यांचा फडही रंगतो. या कुस्त्यांसाठी राज्यातील अनेक मल्ल एक दिवस आधीच शिवलीत दाखल होतात. या चार दिवस चाललेल्या यात्रेचा लक्ष्मण शक्तीने समारोप करण्यात येणार आहे. तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवाचा राज्यातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन शिवली येथील यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top