HOME   लातूर न्यूज

लातूरच्या ‘शाहू’ कडून मॅनेजमेंट कोटा रद्द

गुणवत्तेच्या निकषानुसार व राज्य सरकारच्या धोरणानुसार होणार प्रवेश


लातूरच्या ‘शाहू’ कडून मॅनेजमेंट कोटा रद्द

लातूर : राज्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न देणाऱ्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने अकरावी विज्ञानसह सर्व शाखा तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांच्या प्रवेशातील पाच टक्के व्यवस्थापन (मॅनेजमेंट) कोटा रद्द केला आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेने हा निर्णय घेतला असून मॅनेजमेंट कोट्यासह शंभर टक्के जागांचे प्रवेश आता गुणवत्तेच्या निकषानुसार व राज्य सरकारच्या धोरणानुसार होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील व सचिव माजी प्राचार्य अनिरूद्ध जाधव यांनी दिली. यात संत तुकाराम नॅशनल मॉडेल इंग्लिश स्कुलच्या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या अकरावी प्रवेशाचाही मॅनेजमेंट कोटा रद्द केल्याचे प्राचार्य जाधव यांनी स्पष्ट केले. शिक्षणातील लातूर पॅटर्नमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी करतात. यात अकरावी विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी मोठी स्पर्धा आहे. विज्ञान शाखेसाठी अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाह्यित अशा एकूण एक हजार जागा असून त्यापैकी ९५ टक्के जागांवर गुणवत्ता तसेच आरक्षण धोरणानुसार प्रवेश देण्यात येतात. व्यवस्थापन कोट्यातील पाच टक्के जागांवरील प्रवेशासाठी गुणवत्ता व अन्य निकष नाहीत. पूर्वी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना कोट्यातून प्रवेश देऊन सामाजिक आशय जपण्यात येत होता. कालांतराने त्यात बदल झाला. लातूर पॅटर्नमुळे कमी टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून या कोट्यांतील जागांवर प्रवेशासाठी प्रभावी प्रयत्न सुरू झाले. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच पालक विविध माध्यमातून प्रयत्न करू लागले. त्यासाठी आमदार, खासदार, मंत्री व अनेक महत्वाच्या व्यक्तींकडून शिफारस पत्र व फोन आणू लागले. हितचिंतक व नातेवाईकांकडूनही प्रवेशासाठी आग्रह होता. कोट्यात जागा कमी असल्याने सर्वांचे समाधान करता येत नव्हते. यामुळे कमी लोकांचे समाधान आणि मोठ्या संख्येने लोकांची नाराजी मिळायची. ही नाराजी वर्षानुवर्ष कायम रहात असल्याचा अनुभव संस्थेला येऊ लागला. त्यातून विनाकारण गैरसमज वाढू लागले व गैरसमज दूर कसा करायचा, यासाठी संस्था हतबल होऊ लागली. एकंदर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पारदर्शक प्रवेश प्रक्रिया हे संस्थेचे पूर्वीपासून धोरण आहे. त्याला मॅनेजमेंट कोट्यामुळे बाधा येऊ लागली. यामुळे हा मॅनेजमेंट कोटा रद्द करून शंभर टक्के प्रवेश गुणवत्तेच्या निकषावर करण्याचा निर्णय संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. संस्थेचा निर्णय शिक्षण उपसंचालकांना कळवून येत्या २०९-२० या शैक्षणिक वर्षापासून शंभर टक्के प्रवेश गुणवत्तेच्या निकषावर व राज्य सरकारच्या धोरणानुसार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिफारशी देऊ नयेत
येत्या शैक्षणिक वर्षापासून अकरावी विज्ञान, कला व वाणिज्य (राज्य मंडळ व सीबीएसई) तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांतील प्रवेशाचा पाच टक्के व्यवस्थापन कोटा भरला जाणार नसल्याने पालकांनी प्रवेशाच्या वेळी कोणाच्याही शिफारसी देऊ नयेत. अशा शिफारशी कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. मान्यवरांनीही शिफारशी करू नये व संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील व प्राचार्य जाधव यांनी केले. या वेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.


Comments

Top