HOME   लातूर न्यूज

धर्मादाय कार्यालय दोषींना पाठीशी घालण्याचे काम करते

महात्मा बसवेश्वर संस्था प्रकरणी माधवराव टाकळीकरांचा आरोप


धर्मादाय कार्यालय दोषींना पाठीशी घालण्याचे काम करते

लातूर : धर्मवीर देशिकेंद्र महाराजांनी १९६२ साली स्थापन केलेल्या श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या उच्च न्यायालयात दोषी ठरलेल्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी लातूरचे धर्मादाय कार्यालय त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा घणाघाती आरोप संस्थेचे सदस्य माधवराव पाटील टाकळीकर यांनी लातुरात पत्रकारांशी बोलतांना
केला. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या संस्थेची निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
लातूरच्या दैदिप्यमान शैक्षणिक वारशांमध्ये श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे योगदान अतुलनिय आहे. मात्र, देशिकेंद्र महाराजांनी ज्या उदात्त भावना व धोरणांसाठी या शिक्षण संस्थेची उभारणी केली होती, त्या संस्थेची अशा पद्धतीने वाताहत होणे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे सांगून माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले २९ जुलै २०१८ रोजी झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत शिवशंकर बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धर्मादाय कार्यालयाकडून अधिकृत घटनेची प्रत दिली गेलेली नसतानाही घटनेची बनावट प्रत काढून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांनी ज्या घटनेच्या आधारावर निवडणूक लढविली होती, ती घटना धर्मादाय कार्यालयाकडून दिली गेली नसल्याचे शपथपत्रच या कार्यालयाने उच्च न्यायालयात दिले आहे. याचाच अर्थ, कांहीही झाले तरी संस्था आपल्याच ताब्यात ठेवायची या हेतूने बिडवे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला हाताशी धरून गैरच नव्हे तर गंभीर कृत्य केल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय चुकीच्या पध्दतीने वागणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना बळ देत असल्याचा आरोप केला. दोषी असणाऱ्या शिवशंकर बिडवे यांना पुन्हा निवडणूक लढवता यावी, यासाठी धर्मादाय कार्यालयच मदत करीत असल्याचे सांगून माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता चालू आहे. आचारसंचिता असतांना कोणत्याही विश्वस्त संस्थेची निवडणूक घेता येत नाही. असे असतानाही या संस्थेवर १७ ऑक्टोबर २०१८ पासून प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला. २३ एप्रिल पासून निवडणूक प्रक्रिया सुरु करून ५ मे २०१९ रोजी मतदान घेण्याचे त्यांनी घोषित केले आहे, हे अत्यंत चुकीचे व मनमानीपणाचे आहे. कांहीही झाले तरी सर्व नियम, आदेश धाब्यावर ठेवून संस्था आपल्याच ताब्यात कशी राहील, या कुटील हेतूने कोणतेही अधिकार नसतांना अनाधिकृत कार्यकारिणी स्थापन करून बँकेत बोगस खाते उघडून आर्थिक गैरव्यवहार करण्याचे कामही बिडवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बिनबोभाटपणे केले आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे लातूरच्या धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाकडे सादर करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे धारिष्ट्य या कार्यालयाने दाखवलेले नाही. त्याबद्दल टाकळीकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. एवढेच नव्हे तर १५ जानेवारी २०१७ पासून ४१ ब ची कार्यवाही प्रलंबित असून त्यात एक महिन्याच्या आत निर्णय द्यावा, असा आदेश धर्मादाय सहआयुक्तांनी केला. होता, त्यावर आजपर्यंतही कार्यवाही केलेली नाही, संस्थेच्या घटनेमध्ये अनधिकृत फेरफार करून खोटी साक्षांकित प्रत तयार केल्याप्रकरणी शिवशंकर बिडवे व इतरांवर गुन्हा सिद्ध होऊनही कार्यवाही केली गेली नाही, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या खात्यातून ३० मार्च २०१९ रोजी ८० हजार रुपये नगदी रोख अनाधिकृत पदाधिकारी व मुख्याध्याक यांनी संगनमताने अपहार केला आहे, विशेष म्हणजे या कालावधीत संस्थेच्या प्रशासक म्हणून निवेदिता पवार या काम पाहत असतानाही हा प्रकार घडूनही कार्यवाही झाली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणातही दोषींवर कार्यवाही करावी, मार्च २०१४ पासून कोणताही अधिकार नसतांना अनाधिकृतपणे बँकेत खाते उघडणे, त्यावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करणे, संस्थेच्या मालमत्तेची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावणे, बेकायदेशीरपणे अधिकार नसतांना निविदा न काढता सदस्यांमार्फत बनावट कागदपत्रे देऊन अपहार करणे, शाळेच्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेणे अशा अनेक तक्रारी पुराव्यांसह दाखल केल्या असतांनाही दोषींवर कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सदस्य सांबप्पा गिरवलकर, कांतराव बुके, बाबुराव तरगुडे, सौ. ललिता पांढरे, गंगाधर कोदळे, योगेश गिरवलकर यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी संस्थेच्या हितासाठी लढणाऱ्या या सदस्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून आपल्या मागण्याचे निवेदन धर्मादाय आयुक्त कार्यालयात सुपूर्द केले.


Comments

Top