HOME   लातूर न्यूज

आता मारुती महाराज साखर कारखाना सुरु करा, दिलीपरावांना दुसरे साकडे!

औसा तालूक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पालकत्व स्विकारण्याची विनंती


आता मारुती महाराज साखर कारखाना सुरु करा, दिलीपरावांना दुसरे साकडे!

लातूर: औसा तालूक्यातील बेलकुंड येथे असणारा मारुती महाराज साखर कारखाना सुरु करुन तालूक्यातील शेतकर्‍यांचे पालकत्व स्विकारावे असे साकडे औसा तालूक्यातील विविध गावचे शेतकरी, सरपंच आणि ग्रामस्थांनी आमदार दिलीपराव देशमुख यांना घातले आहे. या मंडळींनी आमदार देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले. स्व. विलासराव देशमुख यांनी दुरदृष्टीने औसा तालूक्यातील बेलकुंड येथील माळरानावर संत शिरोमणी साखर कारखाना उभा केला. या माध्यमातून तालूक्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवावे यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले. हा कारखाना सुरु झाल्यानंतर तालूक्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान बदलले. परंतू नंतरच्या काळात कारखान्याचे आजी माजी चेअरमन यांच्यात वाद निर्माण झाला यातूनच हा कारखाना बंद पडला. कारखाना बंद पडल्याने शेतकर्‍यांचे सर्वाधिक नुकसान झाले.तालूक्यात कारखाना असल्याने शेतकर्‍यांनी ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरु केली होती. पण मागील ४ हंगामापासून हा कारखाना बंद असल्याने शेतकर्‍यांना लागवड केलेला ऊस कोणत्या कारखान्याला द्यावा हा प्रश्‍न सतावत आहे. इतर कारखाने तालूक्यातील शेतकर्‍यांचा ऊस नेण्यास तयार नाहीत. संत शिरोमणीसह तालूक्यातील किल्लारी येथील कारखाना बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोरील संकट अधिकच गहिरे झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तालूक्यातील सर्व गावातील शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन आमदार दिलीपराव देशमुख यांना साकडे घातले आहे. आ. देशमुख यांच्या नेतृत्वातील सर्व कारखाने योग्य पध्दतीने चालत असून शेतकर्‍यांनाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे आ. देशमुख यांनी तालूक्यातील शेतकर्‍यांचे पालकत्व स्विकारावे आणि बंद असणारा मारुती महाराज साखर कारखाना सुरु करुन तालूक्यातील शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. औसा तालूक्यातील कवळी, मातोळा, आशिव, हसलगण, हिप्परगा(कवळी), उजनी, वांगजी, दुर्गा, मंगरुळ,लिंबाळादाऊ, हारेगांव, मासुर्डी, वानवडा, बेलकुंड, माळकोंडजी, गुबाळ, माळुब्रा, टाका, तुंगी, मसलगा (खु.),लोहटा, चिंचोली सोन यासह विविध गावातील सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य व शेतकर्‍यांनी हे निवेदन आमदार दिलीपराव देशमुख यांना दिले आहे. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर व उस्मानाबाद जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र मोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे, मातोळ्याचे उपसरपंच शाम पाटील यांच्यासह शेतकर्‍यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


Comments

Top