HOME   व्हिडिओ न्यूज

विरोधी पक्षनेत्याने मडक्यात जमवले ४४० रुपये, दिले मनपाला

आधीच अमृत खड्डे, त्यात पथदिवे बंद, दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?


लातूर: कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आज मनपा डोक्यावर घेतली. विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी डोक्यावर मडके घेतले तर सचिन मस्के यांनी डोक्यावर खुर्ची घेतली. हा सगळा त्रागा होता. पथदिव्यांसाठी. शहरातील बहुतांश पथदिवे बंद आहेत. वीज बील भरायला मनपाकडे पैसे नाहीत. त्यामुळे सुळांनी डोक्यावर मडके घेऊन पैसे जमवले. सचिन मस्के यांनी मनपातील खुर्च्यांचा लिलाव करु असा इशारा दिला!
कॉंग्रेस नगरसेवकांनी शहरातील पथदिवे सुरु करावेत यासाठी उपायुक्तांच्या दालनात ठिय्या दिला. मागच्या १५ दिवसांपासून शहर अधांराच्या विळख्यात आहे. शहरातील पथदिवे बंद आहेत त्याच्या निषेधार्थ आज उपायुक्तांसमोर सर्वांनी संताप व्यक्त केला. वेळोवेळी पथदिवे चालू करा अशी मागणी करुनही मनपा प्रशासन चालू करत नाही. यासंदर्भात विरोधीपक्ष नेते दीपक सूळ यांनी चौकशी केली असता त्र्यंबक कांबळे यांनी मनपाकडे पैसेच नाहीत या शब्दात उत्तर दिले. वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने लातूर मनपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पथदिवे मागील १५ दिवसांपासून बंद आहेत. हे पथदिवे सुरू होत नसल्यामुळे कॉंग्रेस नगरसेवकांनी उपायुक्तांच्या दालनात गोंधळ घातला. यावेळी कॉंग्रेस नगरसेवक सचिन मस्केंनी डोक्यावर खुर्ची घेतली व या खुर्चीचा लिलाव करून यातून जो पैसा जमा होइल तो पैसा लोककल्याण निधीमध्ये जमा करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात जर पथदिवे चालू नाही झाले तर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते व अधिकारी यांच्या खुर्च्यांचा लिलाव मनपा प्रांगणातच केला जाईल असे दीपक सूळ म्हणाले. सध्या संक्रातीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गृहिणी घराबाहेर पडतात. रस्त्यांवर असलेल्या अंधारात जर काही घातपात झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल दीपक सूळ यांनी केला. यानंतर दीपक सुळांनी डोक्यावर मडके घेउन महानगरपालिकेच्या परिसरात फ़िरले. वीज बिलासाठी वर्गणी गोळा केली. त्या पैशामधून वीज बील भरण्यासाठी मनपा अधिकार्‍याकडे जमलेले पैसे जमा केले. शहरातील पथदिवे आज चालू झाले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सचिन मस्केंनी दिला. यावेळी नगरसेवक गौरव काथवटे, सचिन मस्के, कैलास कांबळे, युनूस मोमीन, सचिन बंडापल्ले आदी उपस्थित होते.


Comments

Top