HOME   लातूर न्यूज

लातूरला ‘नीट’ केंद्र मंजूर, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश


लातूरला ‘नीट’ केंद्र मंजूर, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

लातूर: शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यभरात ओळख असणार्‍या लातूर शहरात नीट परिक्षेचे केंद्र नव्हते. यामुळेच राज्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरात येत असले तरी त्यांना ही परिक्षा देण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. हे परिक्षा केंद्र लातूरात असण्याची गरज लक्षात घेऊन लातूरात हे केंद्र सुरु व्हावे याकरिता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन देऊन याबाबत पाठपुरावा सुरु केला होता. अखेर पालकमंत्री निलंगेकरांच्या या पाठपुराव्यास यश आले असून लातूरसाठी नीट चे केंद्र मंजूर करण्यात आलेले आहे असे भाजपाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शिक्षणाचा लातूर पॅटर्न राज्यात प्रसिध्द झाल्यामुळे संपूर्ण मराठवाडयासह पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकणासह, मुंबई व पुण्यातील विद्यार्थीही लातूरात शिक्षणासाठी येतात. बारावी पर्यंतचे शिक्षण येथे घेतात. परंतू याच विद्यार्थ्यांना नीट ची परिक्षा देण्यासाठी इतर शहरात जावे लागत होते. लातूरातील महाविद्यालये नीट परिक्षेची जोरदार तयारी करुन घेतात. किंबहूना त्यामुळेच ही महाविद्यालये म्हणजे डॉक्टर तयार करणारी महाविद्यालय म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ठ असला तरी विद्यार्थ्यांसाठी परिक्षा केंद्र नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना दोन-दोन दिवस प्रवास करुन परिक्षेसाठी जावे लागते होते. तेथे राहणे, खाणे व इतर सुविधांची जुळवा जुळव करण्यासाठी आर्थिक व मानसिक ओढाताण होत होती. यामध्ये बराच वेळ जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे परिक्षेवर लक्ष केंद्रीत होत नव्हते. तर पालकांनाही मोठया त्रासाला सामोरे जावे लागत होते.
विद्यार्थ्यांची व पालकांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन लातूरमध्ये नीट चे केंद्र सुरु करण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे निवेदन दिलेले होते. सदर परिक्षा केंद्र सुरु झाल्यास जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल हे पटवून देत परिक्षा केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. पालकमंत्री निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झालेले असून केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी लातूरला नीटचे केंद्र मंजूर केलेले आहे. सदर केंद्र सुरु झाल्याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून पालकमंत्री निलंगेकर यांचे आभार व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Comments

Top