HOME   लातूर न्यूज

०१ लाख चौरस फुटावर शिवरायांची रांगोळी

जागतिक विक्रमाकडे वाटचाल, १७ ते १९ या काळात पाहण्यासाठी खुली


०१ लाख चौरस फुटावर शिवरायांची रांगोळी

लातूर: शिवजयंतीचे निमित्त साधून लातूरचे कलाकार ०१ लाख चौरस फूट अर्थात अडीच एकर जागेवर रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र साकारणार आहेत. यासाठी विविध रंगातील ५० हजार किलो रांगोळीचा वापर केला जाणार असून याकरिता अंदाजे ३ ते ४ लाख रुपये खर्च येणार आहे. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सर्वांना पाहण्यासाठी ही रांगोळी खुली करण्यात येणार आहे. या रांगोळीची गिनीज बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंद होणार आहे अशी माहिती मनपातील भाजपाचे सभागृह नेते तथा शिवमहोत्सव समितीचे सदस्य अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली.
लातूर येथील मंगेश निपाणीकर, दिनेश लोखंडे व तेजस शेरखाने यांचा ५० जणांचा गट ही रांगोळी काढण्यासाठी ६ दिवस परिश्रम घेणार आहेत. ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही रांगोळी काढली जाणार आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या रांगोळीचे उद्घाटन होऊन ती सर्वांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे. जगातील सर्वात मोठी रांगोळी लातूरात काढली जाणार असून ती लातूरची अस्मिता ठरणार आहे. यासाठी गिनीज बुक ऑफ रेकार्डकडे नोंदणी करण्यात आली असून त्यांचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत. यावर्षीच्या शिवमहोत्सव समितीला कोणीही अध्यक्ष नाही किंवा कार्यकारिणी नाही प्रत्येकजण आपआपली जबाबदारी ओळखून कार्य करत आहे, अशी माहितीही गोजमगुंडे यांनी दिली. रांगोळी बाबत माहिती देताना मंगेश निपाणीकर म्हणाले की, अनेक दुर्मिळ रंगाचा वापर यात केला जाणार आहे. रंगाच्या अनेक छटा वापरल्या जाणार असून ही रांगोळी ०३ थ्रीडी स्वरुपात असणार आहे. या रांगोळीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठीत रेखाचित्र साकारले जाणार आहे. यासाठी लागणार खर्च शिवप्रेमी जनता व दानशूर व्यक्तीकडून केला जाणार आहे. पालकमंत्र्यांनीही यात सिंहाचा वाटा उचलण्याचा शब्द दिला आहे. ही रांगोळी काढताना लातूरातील कलाशिक्षक सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. या रांगोळीसाठी अ‍ॅड. वैशाली यादव, अ‍ॅड. गणेश गोमचाळे, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर चेवले, गौरव मदने, प्रा. ओमप्रकाश झुरळे,नितीन कडकंची, गोपी साठे, अभिमन्यू जगदाळे आदिंनी पुढाकार घेतला आहे.


Comments

Top