HOME   लातूर न्यूज

सिध्देश्‍वर यात्रेची जय्यत तयारी, दुग्धाभिषेकाने होणार प्रारंभ

महाआरोग्य शिबीराचे आयोजन, बचत गटांचे प्रदर्शन, संचल्न, झेंडावंदन


सिध्देश्‍वर यात्रेची जय्यत तयारी, दुग्धाभिषेकाने होणार प्रारंभ

लातूर: ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास सोमवार व मंगळवारच्या मध्यरात्री १२ वाजता होणार्‍या गवळी समाजाच्या दुग्धाभिषकाने प्रारंभ होणार आहे. मंगळवारी महाशिवरात्रीपासून २६ फेब्रुवारी पर्यंत ही यात्रा चालणार असून यावर्षी महाआरोग्य मेळावा हे यात्रेचे वैशिष्टे ठरणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरु असून विविध आकाराचे रहाट पाळणे ही दाखल झाले आहेत.
लातूरचे ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानचा यात्रा महोत्सव दरवर्षी आकर्षण ठरतो. यावर्षी १३ ते २६ फेबु्वारी या कालावधीत होणार्‍या या महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १३ रोजी पहाटे १२ वाजता सलामीच्या तोफांची आतिषबाजी व त्यानंतर गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक, नारीयल जल व गंगाजलाचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनास प्रारंभ होणार आहे. मंगळवारी सकाळी संत सावता माळी भजनी मंडळाच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून सकाळी ९ वा. पुष्पाभिषेक केला जाणार आहे. याचवेळेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते महापूजा व ध्वजारोहण होणार आहे. वेदमंत्रांच्या जयघोषात ही पूजा संपन्न होणार असून त्यानंतर पोलिस बँडचे संचलन होणार आहे. दुपारी १ वाजता गौरीशंकर मंदिरापासून झेंडा मिरवणूक निघणार आहे. याच दिवशी रात्री ९ ते १२ ज्ञानोबा माऊली महाराज अष्टेकर यांचे किर्तन व त्यानंतर बाबुराव बोरगांवकर व रामभाऊ बोरगांवकर यांचे संगीत भजन संपन्न होणार आहे.
बुधवार १४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विविध स्टॉलचे उद्घाटन, कृषी व पशु प्रदर्शन विविध स्पर्धा, भजन व किर्तन असे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वारकरी स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. रांगोळी, ऊखाणे, महाराष्ट्रीयन वेशभूषा पेहराव आदी स्पर्धा ही संपन्न होणार आहेत. बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात्रे दरम्यान येणार्‍या भाविकांसाठी मोफत भोजनाची सोयही करण्यात आली आहे. महाआरोग्य मेळावा हे यावर्षीच्या यात्रेचे वैशिष्टे असणार आहे. या मेळाव्यात मोतीबिंदूपासून कर्करोगापर्यंत सर्व प्रकारचा आजारांच्या तपासण्या करुन त्यावर उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. विविध १४ रुग्णांलयातील तज्ञ डॉक्टर्स यात सहभागी होऊन रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. यात्रेचे प्रमुख आकर्षण असणारे विविध आकारातील रहाट पाळणे मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. त्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. यात्रेच्या प्रारंभानंतर भक्तांना विविध प्रकारची खरेदी व मौजमजेसाठी विविध खेळही उपलब्ध आहेत. दि.२५ फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धा झाल्यानंतर सोमवार दि. २६ रोजी महिला भजनी मंडळाची भजन स्पर्धा, शोभेच्या दारुची आतिषबाजी, काल्याचे किर्तन, व श्रीं ची पालखी व महाप्रसाद होऊन यात्रेची सांगता होणार आहे. ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक मेजवानीचा शहरासह जिल्हा व परिसरातील भाविक व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, संयोजक अशोक भोसले, बाबासाहेब कोरे यांच्यासह विश्‍वस्त मंडळाने केले आहे.


Comments

Top