HOME   टॉप स्टोरी

दुष्काळ, नोटाबंदी, जीएसटी, गारपीट आणि त्यात यात्रा!

गवळी समाजाचा दुग्धाभिषेक, जिल्हाधिकार्‍यांनी केले ध्वजारोहण, कृषी प्रदर्शन, आरोग्य शिबिराचे आयोजन


लातूर: ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ६५ व्या सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. मध्यरात्री १२ च्या सुमारास गवळी समाजाच्या वतीने सिध्देश्‍वरास दुग्धभिषेक करण्यात आला तर सकाळी १० वाजता जिल्हधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन या यात्रा महोत्सवाचा शुभांरभ करण्यात आला. ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या वतीने सिध्देश्‍वर मंदिराच्या प्रांगणात प्रतिवर्षी यात्रा महोत्सव पार पडतो. महाशिवरात्रीचे औचित्य साधून आयोजित करण्यात यात्रा महोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी उत्साहात झाला. गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री १२ च्या सुमारास सिध्देश्‍वरास दुग्धभिषेक करण्यात आला. यानंतर सिध्देश्‍वराच्या दर्शनास सुरुवात झाली. महाशिवरात्री निमित्त शहर व परिसरातील भाविकांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. देवस्थानच्या वतीने दर्शनास आलेल्या भाविकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी सपत्नीक सिध्देश्‍वराला महाअभिषेक केला. यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त विक्रम गोजमगुंडे, यात्रा संयोजक अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, धर्मादाय सह आयुक्त हार्लेकर, तहसिलदार संजय वरकड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे यांची उपस्थिती होती. सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून महाशिवरात्री निमित्त सिध्देश्‍वर मंदिराच्या सभागृहात सायकल ब्रँडच्या वतीने १० फुटी अगरबत्ती लावण्यात आलेली आहे. या अगरबत्तीचे प्रज्वलन जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. ही अगरबत्तीमुळे तब्बल अडीच दिवस मंदिर परिसर सुगंधाने दरवळणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने झेंड्य़ाची शाही मिरवणूक, कृषी व पशू प्रदर्शन, १००१ महिलांच्या वतीने रुद्राभिषेक, आरोग्य मेळावा, कुस्ती स्पर्धा आणि शोभेच्या दारुची आतषबाजी आयोजित करण्यात आली आहे.


Comments

Top