HOME   महत्वाच्या घडामोडी

पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य

दुष्काळाशी सामना करण्यासाठी दक्ष रहावे- मुख्यमंत्री

पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य

जालना: येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला समोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांचा व शासनाच्या महत्वकांक्षी योजनांचा आढावा मुख्यमंत्र्‌यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला, यावेळी ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्यव्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,आमदार राजेश टोपे, तसेच मुख्यमंत्र्‌यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांविषयी जाणून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालना जिल्ह्यातील यावर्षी झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे व पाटबंधारे प्रकल्पातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे पुढील तीन–चार महिन्यांसाठी पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यांच्या पर्यायी उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यक तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देतानाच इतरही उपाय योजनांची प्राधान्याने अंमलबजावणी केली पाहिजे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्धतेच्या भागात रोपे व बियाणे देवून चारा उत्पादनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी बारकाईने नियोजन आराखडा तयार करावा. डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध असला तरी आत्तापासूनच पुढील नियोजन करण्यात यावे.


Comments

Top