HOME   लातूर न्यूज

मृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड

पवित्र चंद्रभागेच्‍या आरती प्रसंगी वारकऱ्यांना विनंती

मृत नद्यांना पुनर्जीवित करा- श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड

पंढरपूर,: दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या मृत नद्यांना पुनर्जीवित केले नाही तर भविष्यात मानव जातीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. प्रदुषित पर्यावरणासारखी समस्‍या २०२५ पर्यंत प्रखरतेने जाणवेल. त्‍यासाठी प्रत्‍येक वारकऱ्यांने घरातील जेवढे सदस्य आहेत त्‍यांच्‍या नावे दोन दोन झाडे लावावीत. अशी विनंती बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे पणतू श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांनी वारकऱ्यांना केली.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने ‘पवित्र चंद्रभागे’ची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन .पठाण, सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ.उषा विश्वनाथ कराड, सौ. ज्‍योती कराड-ढाकणे, प्रा. स्‍वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, मुंकुंद चाटे, अजित गोसावी, सरकार निंबाळकर, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते. श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड म्हणाले, वारकऱ्यांनो दोन्‍ही हातांनी झाडे लावा तसेच पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करा. दिवसंदिवस कमी होत जाणारी पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करावी लागेल. त्‍यासाठी सरकारद्वारा चालविण्यात येणाऱ्या पाणतळ योजना, सिंचन योजना शेत तळे सारख्या आदी योजना अमलात आणावी. पाझर तलावांची संख्या वाढवून मृत नद्यांना पूनर्जिवीत करा. पंढरीच्‍या तीर्थ क्षेत्राला आता ज्ञान तीर्थ क्षेत्र बनविण्यासाठी वारकऱ्यांनी नद्यात घाण व कचरा टाकू नये. यासाठी सहकार आणि ऐक्‍याशिवाय हे उपक्रम यशस्‍वी होऊ शकत नाही. म्‍हणून समाजातील माणसाचे मनोबल बदलण्याची आवश्यकता आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू करून सरकारने अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नद्यांना पुनर्जीवन मिळेल. त्यामुळे यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. या ठिकाणी उत्तम प्रकाराच्या घाटांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असून ते ज्ञानपंढरी म्हणून ओळखले जाते. भविष्यात वारकरी संप्रदाय जगाला सुख समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.
डॉ.एस. एन. पठाण म्‍हणाले, ‘सृष्टीमधील अनेक नद्या मृत झाल्या आहेत. नदीमध्ये ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढायला हवे. यात कमीत कमी ९पीपीएम ऑक्‍सिजनची आवश्यकता असते. तसे पाहिले तर २० पीपीएमच्‍या वर ऑक्‍सिजनची गरज आहे. परंतू बऱ्याच नद्या या आता मृतावस्‍थेतील झाल्‍या आहेत. भविष्यात ही समस्‍या उग्र रूप धारण करेल त्‍यामुळे २०७० पर्यंत आम्‍हाला प्‍यायला पाणी व ऑक्‍सिजन मिळणार नाही. या पासून स्‍वतःला व येणाऱ्या पिढीला सुरक्षित करण्यासाठी सर्व वारकऱ्यांना संकल्‍प करावा लागेल की नदी प्रदूषण कमी करू. सरकारने नमामि गंगे सारखा उपक्रम सुरू केला पण त्‍याला हवी तेवढी गती मिळाली नाही. त्‍यासाठी सर्वांना एकत्रित होऊन कार्य करण्याचे आवाहन त्‍यांनी केले. शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, आभार मानले.


Comments

Top