HOME   लातूर न्यूज

मोकाट सुटलेल्या पाळीव जनावरांची रवानगी होणार गोरक्षणमध्ये

महानगरपालिकेने दिली तंबी, जनावर नेण्याची दोनदाच संधी

मोकाट सुटलेल्या पाळीव जनावरांची रवानगी होणार गोरक्षणमध्ये


लातूर: येथील रस्त्यावर दोनपेक्षा जास्त वेळेस मोकाट सुटलेल्या पाळीव जनावरांची रवानगी गोरक्षणमध्ये कायम स्वरुपी केली जाईल असा इशारा महानगर पालिकेने प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिला आहे. त्याचबरोबर दोन वेळेस पकडलेल्या जनावरासाठी मालकाला शुल्क द्यावे लागेल असेही पत्रकात म्हणले आहे.
शहरात गल्ली बोळात मालक आपली जनावरे मोकाट सोडतात. त्याचा नागरिकांना तसेच रहदारीला त्रास होत आहे. अशा जनावरांना पकडण्याची मोहीम अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. आत्तापर्यंत ३५ जनावरे पकडण्यात आली आहेत. ही जनावरे सात दिवसांसाठी फ़क्त दोन वेळेस पकडली जातील असे प्रसिध्दी पत्रकात म्हणले आहे. यातही मालकांना आपली जनावरे ताब्यात घेताना पहिल्या वेळेस एक हजार रुपये तर दुसर्‍यावेळेस अडीच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच संगोपनासाठी मालकाला प्रतिदिन २०० रुपये वेगळा खर्च द्यावा लागणार आहे. या दरम्यान जनावरे आजारी पडली तर त्याचा वैद्यकीय खर्चही वेगळा द्यावा लागणार आहे. मात्र तिसर्‍या वेळेस तिच जनावरे पुन्हा पकडली तर त्यांची रवानगी गोरक्षणमध्ये कायमस्वरुपी केली जाणार असल्याचे पत्रकात म्हणले आहे.



Comments

Top