HOME   टॉप स्टोरी

अफलातून आणि अदभूत रांगोळी

अष्टविनायकच्या गणेश सभागृहात अचंबित करणार्‍या कलाकृती

अफलातून आणि अदभूत रांगोळी

लातूर: लातूरकरांच्या हृदयात वर्षानुवर्षे वसलेल्या नेत्यांच्या प्रतिमा जेव्हा रंगीबेरंगी रांगोळीतून साकारतात, तेव्हा छायाचित्रांमधूनही मिळणार नाही असा अनोखा हुबेहूब प्रतिमांचा प्रत्यय रसिकांना आल्याशिवाय राहत नाही. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील जूचंद्र या 'कलाकारांच्या गावा'तील विख्यात रंगावलीकार मिनार पाटील आणि त्यांचे सात सहकारी अष्टविनायक मंदिराच्या लगत असलेल्या गणेश हॉलमध्ये हा अनोखा अनुभव आपल्या प्रदर्शनातून देत आहेत.
मिनार पाटील आणि त्यांचे सहकारी गणेश सालियन, केतन पाटील, भारत प्रधान, स्नेहा माळवी, जयेश म्हात्रे आणि समीत पाटील या सर्वांनी मिळून रंगावलीचा मनोरम आविष्कार गणेश हॉलमध्ये साकारला असून, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमा तर एवढ्या ताकदीने मिनार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रांगोळीतून साकारल्या आहेत, की प्रेक्षकांना कलाकृतीतील अस्सल जिवंतपणा ही काय चीज आहे, याची खात्री पटावी. या प्रदर्शनात छत्रपती शिवरायांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक, पाण्यात सचैल स्नान करणारे निरागस बालक आणि त्याचे मुक्त हास्य, पूर्वीच्या आणि आताच्या पिढीच्या हातातील खेळ, भोजनाची थाळी ही हुबेहूब रंगावली पाहणाऱ्यांना विलक्षण सुखावून टाकणारी आहे. जूचंद्र हे गाव पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात येते. १५ हजार लोकसंख्येच्या या गावातून प्रत्येक घरामध्ये एकजण कोणत्या ना कोणत्या कलेत पारंगत आहे. कोणी रांगोळी, कोणी नृत्य, कोणी चित्रकला वा कीर्तनकार किंवा वादक असा घरटी एक कलावंत या गावात आहेच. रंगावलीकार तर तब्बल २०० आहेत, असे मिनार पाटील म्हणाले. यावेळी अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, मुख्याधिकारी व माजी नगरसेविका रेखा नावंदर यांची उपस्थिती होती.


Comments

Top