HOME   लातूर न्यूज

वैशालीताई देशमुख यांना वसंतदादा इन्स्टिटयुटचा ‘ऊस भूषण’ पुरस्कार

हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्याबद्दल सन्मान

वैशालीताई देशमुख यांना वसंतदादा इन्स्टिटयुटचा ‘ऊस भूषण’ पुरस्कार

लातूर: हेक्टरी सर्वाधिक ऊस उत्पादन केल्याबद्दल विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ‘ऊस भूषण’
हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख या स्वत: अत्यंत उत्तम रितीने शेती करीत आहेत, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन बाभळगाव येथील आपल्या शेतीमध्ये ऊस उत्पादना बरोबरच, शेड - नेटच्या माध्यमातूनही त्यांनी इतर अनेक उत्पादने घेतली आहेत. त्यांनी शेतीमध्ये केलेले नव – नवीन प्रयोग पाहून परीसरातील शेतकरी त्यांचे अनुकरण करीत आहेत. सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात, त्यांनी पारंपारिक व अद्यावत तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधून ऊसाचे एकरी उत्पादन वाढवले आहे. राज्याच्या उत्तरपूर्व विभागात सर्वसाधारणपणे हेक्टरी होणाऱ्या ऊस उत्पादनाच्या तुलनेत विक्रमी म्हणजे प्रति हेक्टरी ३२१.२१ मेट्रीक टन ऊस उत्पादन घेतले आहे. त्याच्या या कर्तत्वाची दखल घेवून पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने अत्यंत मानाचा समजला जाणारा ऊस भूषण हा पुरस्कार जाहिर केला.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी खास पत्र पाठवून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. आपले हे कतृत्व कौतुकास्पद असून महाराष्ट्राची मान जागतिक स्तरावर उंचावणारे ठरले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. १५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारावा अशी विनंती महासंचालक देशमुख केली आहे.


Comments

Top