HOME   लातूर न्यूज

राजस्थानी सेवा संघ ट्रस्टचे गोशाळेला ९० हजारांचे अर्थसहाय्य

शिवकुमार डिगे यांच्या आवाहनास प्रतिसाद, दोन गोशाळांचा समावेश

राजस्थानी सेवा संघ ट्रस्टचे गोशाळेला ९० हजारांचे अर्थसहाय्य

लातूर: दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन लातूर येथील राजस्थानी सेवा संघ ट्रस्ट ने पेठ येथील राधाकृष्ण गोशाळा व गुरु गणेश गोशाळेस प्रत्येकी ४५ हजार असे एकूण ९० हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. राज्याचे माजी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत राजस्थानी सेवा संघ ट्रस्टने राधाकृष्ण गोशाळेला ४५ हजार रुपये व गुरु गणेश गोशाळेस ४५ हजार रुपये अर्थसहाय्य केले असून दोन्ही गोशाळेला त्या रकमेचे धनादेश देण्यात आले आहेत. सदर धनादेश धर्मादाय उपायुक्त सौ. यु.एस. पाटील ( चव्हाण ), सहाय्यक धर्मदाय आयुक्त पी.व्ही. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी राजस्थानी सेवा संघ ट्रस्ट चे अध्यक्ष दामोधर भुतडा, सचिव गोवर्धन भंडारी यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीत मुक्या प्राण्यांसाठी सेवाभावी संस्था व ट्रस्ट नी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन माजी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केले होते. त्यानुसार सदर उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना अ‍ॅड. संतोष गिल्डा यांनी मुक्या जनावरांचे पालन पोषण करणे हे अत्यंत महत्वाचे कार्य असून या गोशाळा ते कार्य अत्यंत खंबीरपणे करीत आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गोविंद कोठारी, सत्यनारायण सोनी,शरद डुंगरवाल. राजेश डुंगरवाल, अनिल डुंगरवाल, जयनारायण खंडेलवाल, नंदकिशोर लोया, बालकिशन लोया, लक्ष्मीकांत अग्रोया, महेश सोमाणी, दीपक राठी, सुमतीलाल छाजेड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Comments

Top