HOME   लातूर न्यूज

अभिनेते अतुल कुलकर्णी यांना 'डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार'

२७ जानेवारी रोजी उदगीर येथे होणार पुरस्काराचे वितरण

अभिनेते अतुल कुलकर्णी यांना 'डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार'

लातूर: उदगीर आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय विकासात वैचारीक योगदान देणारे दिवंगत समाजवादी विचारवंत प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लोखनीय कार्य करीत पुरोगामी विचारांची पेरणी करणाऱ्या व्यक्तींना, 'छात्रभारती' विद्यार्थी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने, 'डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गतवर्षी हा पुरस्कार माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते शिक्षक आमदार कपिल पाटील यांना प्रदान करण्यात आला होता.
पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून यावेळी हा पुरस्कार प्रथितयश सिने अभिनेते अतुल कुलकर्णी यांना प्रदान करण्य़ात येणार आहे. १० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे जन्मलेल्या अतुल कुलकर्णी यांनी हिंदी, मल्याळम, तमीळ, तेलगु, कन्नडा आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला असून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आदिवासी मुलांसाठी उभारलेले त्यांचे काम उल्लेखनीय आहे. यापूर्वी अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या अतुल कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात अतुल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत अलका धुपकर, विलास बडे हे घेणार आहेत.
अतुल कुलकर्णी यांना हा पुरस्कार येत्या २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पुरस्कार समितीचे कार्यवाह अजित शिंदे, दिलीप वाघमारे, अंकुश गायकवाड, पुरुषोत्तम भांगे, धनाजी बनसोडे, रवींद्र हसरगुंडे, विनायक चाकुरे, राजकुमार करंजे आदींच्यावतीने करण्यात आले आहे.


Comments

Top