HOME   लातूर न्यूज

आजची महाविद्यालये बेरोजगारी निर्माण करणारे कारखाने

शिक्षणक्षेत्र राजकारणरहित असावे- उच्चतंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे

आजची महाविद्यालये बेरोजगारी निर्माण करणारे कारखाने

लातूर दि.18- “असर” या संस्थेने मागील चार वर्षात देशभरातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात जास्त प्रगती ही महाराष्ट्र राज्यात झाली असून आपलं राज्य हे देशपातळीवर अग्रेसर ठरले, असल्याची माहिती शालेय शिक्षण, उच्च-तंत्रशिक्षण, क्रीडा, अल्पसंख्यांक मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. राजर्षि शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित दुसरा पदवी वितरण समारंभा प्रसंगी तावडे बोलत होते. यावेळी कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पूर्नवसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी खासदार तथा शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव पाटील, आमदार विक्रम काळे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक बळीराम लहाने, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर आदिसह विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. उच्च-तंत्रशिक्षण मंत्री तावडे म्हणाले की, राज्य शासन कौशल्यावर आधारित शिक्षणाला महत्व देत आहे. त्यानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु केले जात आहेत. लोकल टू ग्लोबल हा शैक्षणिक दर्जा ठेवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध्‍ केले जात असून मागील तीन वर्षात राज्यातील ३४ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मराठी माध्यमात प्रवेशित झाले आहेत, असे सांगून शासन शिक्षणाला राजकारणापासून दूर ठेवत असल्याचं त्यांनी म्हटले. तसेच देशपातळीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक क्षेत्रात जी प्रगती करत आहे त्याचे सर्व श्रेय हे येथील शिक्षकांना असल्याचे तावडे यांनी सांगून विद्यार्थ्यांना मातृ भाषेतूनच शिक्षण दिले पाहीजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याप्रमाणेच या पुढील काळात समाजाने आपल्या मनातील पदवी शिक्षणाचं भूत काढून कौशल्य शिक्षणाला महत्व दिले पाहीजे. कारण आजची महाविद्यालये ही बेरोजगारी निर्माण करणारे कारखाने बनली आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार विक्रम काळे व डॉ. गोपाळराव पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. तर शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गव्हाणे यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक संस्थांच्या कार्याची माहिती दिली. प्रारंभी छत्रपती राजर्षि शाहू महाराजाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे व मान्यवरांच्या हस्ते राजर्षि शाहू महाविद्यालयातील पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Comments

Top