HOME   टॉप स्टोरी

जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा शासनादेश जारी

प्रत्यक्ष कामास लवकरच होणार प्रारंभ -अभिमन्यू पवार

जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा शासनादेश जारी

लातूर: जिल्हा सामान्य रुग्णालय उभे करण्यासाठी जागा देण्यास मान्यता देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला असून केवळ मंजुरी देऊन न थांबता यासंदर्भातील शासनादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी दिली.
लातूरचे जिल्हा रुग्णालय शासकीय महाविद्यालयास जोडण्यात आले. त्यामुळे लातूरला नवे रुग्णालय असावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रुग्णालयाला मंजुरीही मिळाली होती. पण जागेअभावी हे रुग्णालय उभे राहत नव्हते. लातूर येथे झालेल्या अटल महाआरोग्य शिबिरात अभिमन्यू पवार यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यानी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. या घडामोडीनंतर ०८ डिसेंबर रोजी झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत जागा देण्याचा ठराव मंजूर करून तसे पत्रही शासनाला देण्यात आले होते. राज्य शासनाने यासंदर्भात वेगाने पावले टाकत ही जागा रुग्णालयाला देण्यासंदर्भात कार्यवाही केली. त्यानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य विभागाचे कार्यासन अधिकारी प्रताप गीते यांच्या स्वाक्षरीने जागा देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. कुठल्याही उपक्रमाला मंजुरी मिळणे, त्यासाठी जागा मिळणे याला मोठा कालावधी लागत असताना मुख्यानमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे अवघ्या दोन महिन्यात रुग्णालयाला जागा मिळाली आहे. या जागेवर रुग्णालयाची भव्य इमारत लवकरच उभी राहणार असून त्यासाठीही शासनाकडून भरीव मदत मिळवून देऊ अशी माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली. अनेक वर्ष रखडलेला रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अभिमन्यू पवार यांनी सोडवला. या जागेवर रुग्णालय उभे राहिल्यानंतर गोरगरीब रुग्णाना उपचाराची सोय होणार आहे.
शहराच्या पूर्व भागाला आतापर्यंत कसलाही मोठा प्रकल्प मिळाला नव्हता. त्यामुळे या भागात रुग्णालयासारखा प्रकल्प असावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी जागा दिली. यामुळे या भागातील जनतेच्या उपचाराची सोय होणार असून त्यांना चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत. यासाठी अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विद्यापीठाच्या कुलगुरुंचे आभार मानले आहेत.


Comments

Top