HOME   लातूर न्यूज

महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण बाभळगावात

पालकमंत्री करणार ध्वजारोहण, सकाळी आठ वाजता होणार कार्यक्रम

महाराष्ट्र दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण बाभळगावात

लातूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण दिनांक ०१ मे रोजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी ०८ वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन साजरा करणे बाबतची आढावा बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, पोलिस उपअधिक्षक मधुकर जवळकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, तहसिलदार अहिल्या गाठाळ, अविनाश कांबळे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे म्हणाले की, महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या सर्व विभागानी आपली जबाबदारी योग्यपणे व इतर विभागाशी समन्वय ठेवून पार पाडावी, असे त्यांनी सूचित केले. सर्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस मुख्यालयावर मुख्य ध्वजारोहणाच्या अनुषंगाने पेंडॉल, मैदानाची दुरुस्ती, ध्वजस्तंभाची रंगरंगोटी या व इतर सुविधा द्याव्यात. तर महापालिकेने लातूर शहरातील महत्वाचे मार्ग तसेच पोलिस मुख्यालयातील प्रांगणाची स्वच्छता करावी. त्याप्रमाणेच मुख्य कार्यक्रमात पथ संचलनात सहभागी होणाऱ्या पोलिस कर्मचारी व विद्यार्थ्यांना नाश्ता, चहापानी आदिंची व्यवस्था करावी, अशी सूचना डॉ. गव्हाणे यांनी दिल्या.


Comments

Top