HOME   महत्वाच्या घडामोडी

शेतमालाच्या भावाच्या तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना रोखीने द्यावी !

महिला तंत्रनिकेतन बंद करु नका, आ. अमित देशमुख यांची विधानसभेत मागणी

शेतमालाच्या भावाच्या तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना रोखीने द्यावी !

मुंबई: शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या खरेदी केंद्रावरही त्यांचा शेतमाल घेतला जात नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतमालाच्या भावातील तफावतीची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना अमित देशमुख यांनी शेतमालाच्या कोसळलेल्या दरामुळे निर्माण झालेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सरकारने हमी भावाने खरेदी करण्यासाठी केंद्र सुरु केले असले तरी या केंद्रावर खरेदी होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. शेतमाल विकण्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांकडे जावे लागते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव व बाजारभाव यात असणाऱ्या तफावतीची रक्कम रोखीने द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली. मध्यप्रदेश व अन्य काही राज्यांनी अशी योजना सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
लातूर रिंगरोडसाठी निधी द्या !
लातूर शहराचा झालेला विस्तार लक्षात घेऊन 'आउटर रिंगरोड' मंजूर करण्यात आला. त्यासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. परंतु निधी अभावी हे काम अडकले आहे. त्यामुळे तातडीने या कामासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी आ. अमित देशमुख यांनी केली. ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी, 'खड्डा दाखवा व एक हजार रुपये मिळवा' अशी घोषणा केली. परंतु रस्त्यांची प्रत्यक्ष स्थिती पाहता, 'खड्डा चुकवा व लाख रुपये मिळवा' अशी घोषणा केली तरी कोणाला बक्षीस मिळवता येणार नाही अशी आहे. मोठी वाहने सोडाच पण या रस्त्यांवर मोटारसायकलवरून सुद्धा प्रवास करणे कठीण आहे. या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागत असल्याच्या गंभीर बाबीकडे लक्ष वेधताना, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्यात यावे अशी मागणी आ. देशमुख यांनी केली.
महिला तंत्रनिकेतन बंद करू नये !
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याची योजना शासनाने आणली आहे. यासाठी लातूर येथील महिला तंत्रनिकेतन दुसरीकडे हलवून तेथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालय अन्यत्र सुरू करावे, परंतु त्यासाठी महिला तंत्रनिकेतन बंद करू नये अशी मागणी अमित देशमुख यांनी केली. सामाजिक न्याय विभागाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. ती तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली.
पानगाव येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करा !
रेनापूर तालुक्यात्यातील पानगाव येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु त्यासाठी अद्याप आर्थिक तरतूद केलेली नाही. तातडीने ही तरतूद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या लॉकपमधील आरोपीच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आ. अमित देशमुख यांनी केली.


Comments

Top